महामार्गावर पुन्हा अपघात, ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 13:07 IST2020-05-17T13:07:04+5:302020-05-17T13:07:47+5:30
एक गंभीर जखमी

महामार्गावर पुन्हा अपघात, ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
जळगाव : परप्रांतीयांना घेऊन जाणाऱ्या ट्रकने जळगावनजीक पाळधी येथून येणाºया दोघं भावांच्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात महेंद्र रमेश पाटील (वय-३६, दोन्ही रा. पाळधी, ता.धरणगाव) हा तरुण जागीच ठार झाला. तर त्याचा भाऊ प्रल्हाद रमेश पाटील (वय-३०) हा गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ समोर झाला. जखमीस शहरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
महेंद्र रमेश पाटील (वय-३६) आणि प्रल्हाद रमेश पाटील (वय-३०, दोन्ही रा. पाळधी ता.धरणगाव) हे दोन्ही भाऊ चहा पावडरचा खेडोपाडी जावून व्यवसाय करतात. रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास बांभोरी येथे कामाच्या निमित्ताने दोघे सोबत वेगवेगळ्या दुचाकीने जात असताना परप्रांतीयांना घेवून जाणाºया ट्रकने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या गेट समोर मागून जोरदार धडक दिली. यात महेंद्र पाटील जागीच ठार झाला तर प्रल्हाद पाटील हा गंभीर जखमी झाला. अपघात होताच परिसरातील नागरिक व महामार्गावरील वाहनधारकांनी धाव घेतली. जखमी प्रल्हाद पाटील याला उपचारासाठी शहरातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मयत महेंद्रचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला. शवविच्छेदन करून रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयताच्या पश्चात दोन भाऊ, आई-वडील असा परीवार आहे. अपघातप्रकरणी पाळधी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
दरम्यान, ट्रकने धडक दिल्याने एक ठार झाला आहे हे लक्षात येताच ट्रक चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांच्या सतर्कतेने वाहनचालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.