अन् चुकला काळजाचा ठोका; चाळीसगावला पुन्हा आला पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:21 IST2021-09-09T04:21:14+5:302021-09-09T04:21:14+5:30
गेल्या काही दिवसांपासून चाळीसगाव शहरासह ग्रामीण भागात पावसाची संततधार कायम असल्याने ३० ऑगस्ट रोजी अतिवृष्टी झाली. ३१ रोजी आलेल्या ...

अन् चुकला काळजाचा ठोका; चाळीसगावला पुन्हा आला पूर
गेल्या काही दिवसांपासून चाळीसगाव शहरासह ग्रामीण भागात पावसाची संततधार कायम असल्याने ३० ऑगस्ट रोजी अतिवृष्टी झाली. ३१ रोजी आलेल्या पुराने अनेकांचे संसार गिळले. घरे वाहून गेली. हजारो एकर शेतीचे नुकसान झाले असून, हजारो जनावरे मृत्युमुखी पडली. जीवित, वित्तहानी झाल्याने ग्रामीण भागात अजूनही सन्नाटा आहे. शहरातही शिवाजी घाटावरील दुकानदारांचे मोठे नुकसान झाले. रिंगरोड भागासह दाळेवाले खळे परिसरातील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी घुसले. त्यामुळे नागरिकांना मोठा फटका बसला आहे.
पुराच्या याच कटु आठवणी आठ दिवसांच्या अंतराने बुधवारी सकाळी पुन्हा ताज्या झाल्याने चाळीसगावकर चांगलेच धास्तावले. पहाटेपासूनच डोंगरी व तितूर दुथडी भरून वाहत होत्या. घाट रोडवरील पुलासह भाजी मंडईच्या जवळील पुरावरूनही चार ते पाच फूट पाणी वाहत होते. मंगळवारी सकाळी ११ वाजता बामोशी बाबांच्या दर्गाहातील पायऱ्यांपर्यंत पुराचे पाणी पोहोचले. बुधवारी दुपारनंतर पाणी ओसरण्यास सुरुवात झाल्यानंतर दुपारी १ वाजता वाहतूक सुरू होऊन संपर्कही पूर्ववत झाला.
चौकट
आमदारांसह प्रांताधिकारी व तहसीलदारांचे ‘जागते रहो’
मंगळवारी असलेली पावसाची संततधार, घोडेगाव व करजगाव परिसरात झालेली अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर येणार हे निश्चित होते. त्यामुळे प्रशासन अलर्ट झाले. नदीकाठावरील नागरिक, दुकानदारांना सर्तकतेच्या सूचना दिल्या गेल्या. नवीन पुलावरील फेरीवाल्यांना मंगळवारी दुपारीच येथून हटविण्यात आले. रात्री १२ नंतर नद्यांमधील पाणी पातळीत मोठी वाढल्याने मध्यरात्री आमदार मंगेश चव्हाण हे घाटरोडवर पोहोचले. बुधवारी पहाटे ५ वाजेपर्यंत त्यांच्यासह प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून होते. नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यासाठी पालिकेचा सायरनही वाजविण्यात आला.
-खडकी बु. येथे नदी काठालगत राहणाऱ्या १००हून अधिक नागरिकांना बुधवारी पहाटे धनंजय मांडोळे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत सुरक्षितस्थळी हलविले.
चाैकट
हिरापूर रोड परिसरात नदीकाठच्या अनेक घरांमध्ये शिरले पाणी
बुधवारी पहाटे तितूर नदीला पूर आल्याने हिरापूर रोडलगत नदी काठावर असणाऱ्या अनेक घरांमध्ये १० ते १२ फुटांपर्यंत पुराचे पाणी घुसले. यात काहींचे संसार वाहून गेले. त्यामुळे हे नागरिक हवालदिल झाले आहेत.
- मंगळवार अखेर तालुक्यात ८९० मिमी पावसाची नोंद झाली असून, गेल्या अनेक वर्षात प्रथम विक्रमी पर्जन्यमान झाल्याने ओल्या दुष्काळी स्थिती उद्भवली आहे.