कोरोनावर ‘प्राणायाम’ची मात्रा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:16 IST2021-05-09T04:16:52+5:302021-05-09T04:16:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना हा विषाणूजन्य आजार फुप्फुसाशी संबंधित आजार आहे. त्यामुळे कोरोनाच्या या कठीण काळात आपले ...

कोरोनावर ‘प्राणायाम’ची मात्रा !
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना हा विषाणूजन्य आजार फुप्फुसाशी संबंधित आजार आहे. त्यामुळे कोरोनाच्या या कठीण काळात आपले आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी प्राणायामचे महत्त्व आणखी वाढले आहे. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण योग्यस्थितीत ठेवणे, फुफ्फुस निरोगी ठेवणे, यात प्राणायाम खूप उपयोगी ठरत असल्याने लहानांपासून ते वृध्दांपर्यंत सर्वांचा प्राणायम करण्याकडे कल वाढला आहे. सध्या संचारबंदीमुळे विविध ठिकाणी प्राणायामाचे वर्ग बंद असले तरी, ऑनलाईनच्या माध्यमातून नागरिक प्राणायामाचे धडे गिरवत आहेत.
कोरोनाला दूर ठेवण्यासाठी नागरिकांनी निर्बंधाच्या काळात योगा आणि प्राणायाम करावे. योगासन, प्राणायाम आणि ध्यानसाधनेने शरीराची प्रतिकारशक्ती व फुप्फुसाची कार्यक्षमता वाढवा, असा सल्ला सध्या दिला जात आहे. तसेच नियमित प्राणायाममुळे होणारे फायदे सांगून, अनेक डॉक्टर व योगा शिक्षक नागरिकांना नियमित प्राणायाम करण्याचे आवाहन करीत आहे. त्यामुळे नागरिक देखील सध्याच्या कोरोनाच्या भीतीने का होईना, प्राणायाम व योग साधनेवर भर देताना दिसून येत आहेत.
नियमित योगासन व प्राणायाम केला तर शरीराची प्रतिकारशक्ती आणि फुप्फुसाची क्षमता वाढण्यास मदत होते. या सोबतच सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तणाव कमी होतो, मेंदूची क्षमता वाढते. त्यामुळे नागरिक भस्त्रिका, कपालभाती, भ्रामरी व ओंकार हे प्राणायाम करीत आहे.
प्राणायामाचे हे विविध प्रकार सध्याच्या कोरोनाच्या भयावह परिस्थितीत निरोगी शरीरासाठी एक प्रकारे वरदान ठरत असल्याचे नियमित प्राणायाम करणाऱ्या नागरिकांनी सांगितले.
नियमित प्राणायाम केल्याचे फायदे
- शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढून, फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते.
- तणाव दूर होऊन, मन प्रसन्न राहते.
- नियमित प्राणायामामुळे दमा, क्षय, अस्थमा व फुप्फुसाचे रोग बरे बरे होण्यास मदत होते.
-प्राणायामाच्या नित्य सरावाने पचनक्रिया व श्वसनक्रिया सुधारते. मात्र, कुठल्याही प्रकारचे योग किंवा प्राणायम करण्यापूर्वी एकदा योग तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या, असे आवाहन शहरातील योग्य तज्ज्ञांतर्फे व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या संचारबंदीमुळे प्राणायाम वर्ग घ्यायला बंदी आहे. त्यामुळे ऑनलाईन माझे नियमित प्राणायामचे वर्ग सुरू आहेत. आता कोरोना काळात आपले आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी नागरिकांचा प्राणायामकडे कल वाढला आहे.
- हेमांगी सोनवणे, योग तज्ज्ञ
मी गेल्या अनेक वर्षांपासून नियमित प्राणायाम व योगा करते. सध्याच्या कोरोना काळात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती आणि फुप्फुसांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्राणायामाचे विविध प्रकार खूप उपयोगी पडत आहेत. काही दिवसांपूर्वी मलाही कोरोनाची बाधा झाली होती. मात्र, नियमित प्राणायाम व योगामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. काही दिवसातच मी बरे झाले.
- रश्मी माथूरवैश्य