शेतकऱ्यांना मिळाली फळपीक विम्याची रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:21 IST2021-07-07T04:21:31+5:302021-07-07T04:21:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : केंद्र शासनाच्या हवामानावर आधारित फळ पीक विम्याची जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बाकी ८ कोटी ६३ लाख ...

शेतकऱ्यांना मिळाली फळपीक विम्याची रक्कम
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : केंद्र शासनाच्या हवामानावर आधारित फळ पीक विम्याची जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बाकी ८ कोटी ६३ लाख रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार रक्षा खडसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सातत्याने बैठका घेत त्याचा पाठपुरावा केल्याने ही रक्कम शेतकऱ्यांना मिळाली आहे.
हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेच्या अंतर्गत जिल्ह्यात २८८ कोटी ७९ लाख रुपयांची भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना ७४ कोटी ५१ लाख रुपये भरपाईदेखील मिळाली होती. यातील वादळी वारे व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळालेली नव्हती. यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली होती. विविध कारणांमुळे विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी टाळाटाळ केली होती. त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विमा कंपनीच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेत जून अखेर हा प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश दिले होते. त्याची कंपन्यांनी तातडीने दखल घेतली. त्यानंतर शेतकऱ्यांना ८ कोटी ६३ लाख रुपयांची नुकसान भरपाईची रक्कम खात्यात जमा केली आहे. त्याची माहिती ॲग्रीकल्चरल इन्शुरन्स कंपनीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना पत्र लिहून कळवली आहे.