Ambulance breaks down on Dhangaon road | धरणगावला भर रस्त्यावर १०८ अ‍ॅम्बुलन्सचे ब्रेक फेल

धरणगावला भर रस्त्यावर १०८ अ‍ॅम्बुलन्सचे ब्रेक फेल

धरणगाव : येथील ग्रामीण रुग्णालयाच्या १०८ अ‍ॅम्बुलन्सची दुरवस्था झाली असून त्याचा प्रत्यय १३ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आला. या अ‍ॅम्बुलन्सचे अचानक ब्रेक फेल होऊन चार जण जखमी झाले. मात्र चालकाने प्रसंगावधान राखल्याने अनर्थ टळला.
छत्रपती शिवाजी चौकासमोर असलेल्या गर्दीच्या रस्त्यावरुन जाताना अचानक अ‍ॅम्बुलन्सचे ब्रेक फेल झाल्याने मोटारसायकल स्वार व तीन पादचाऱ्यांना धक्का लागल्याने चार जण जखमी झाले. मात्र चालको गाडी वळवून रस्त्यावर असलेल्या दुभाजक व त्यास लागून असलेल्या टेलीफोन खांबास धडकल्याने मोठा अपघात टळला. जखमींपैकी दोघांना जळगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले तर दोघांना किरकोळ मार लागल्याने ग्रामीण रुग्णालयात उपचार केले.
येथील ग्रामीण रुग्णालयाची १०८ अ‍ॅम्बुलन्स (एमएच १४-०७९१) ही गाडी चालक प्रदीप बोदडे (रा.जळगाव) हे चालवित असताना हा अपघात घडला. तांत्रिक बिघाड त्याच्या लक्षात येताच त्यांनी अनेकांना वाचविण्याचा प्रयत्न केला. तरीही त्यात रमेश नथ्थू चित्ते (वय ४९), प्रवीण राजेंद्र शिंदे (वय १८), छगन आनंदा बोरसे यांच्यासह आणखी एक असे एकूण चार जण जखमी झाले. रमेश चित्ते व प्रवीण शिंदे यांना स्थानिक रुग्णवाहिकेने अविनाश संजय चौधरी यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉ.गिरीश चौधरी यांनी ग्रा.रुग्णालयात उपचार केले. घटनास्थळी सपोनि पवन देसले, होमगार्ड अशोक देशमुख आदींनी यांनी तातडीने धाव घेत पंचनामा करुन जेसीबीद्वारे अ‍ॅम्बुलन्स हटवली.

Web Title: Ambulance breaks down on Dhangaon road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.