चारही स्वीकृत नगरसेवकांचा राजीनाम्याचा मुहूर्त ठरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:18 IST2021-01-16T04:18:57+5:302021-01-16T04:18:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपात सत्ताधारी भाजपला सत्तेत येऊन मार्च महिन्यात अडीच वर्षे पूर्ण होणार आहेत. मार्च ...

चारही स्वीकृत नगरसेवकांचा राजीनाम्याचा मुहूर्त ठरला
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपात सत्ताधारी भाजपला सत्तेत येऊन मार्च महिन्यात अडीच वर्षे पूर्ण होणार आहेत. मार्च महिन्यातच महापौर व उपमहापौरांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपणार असून, महापौर व उपमहापौरांसोबतच मनपातील भाजपच्या चारही स्वीकृत नगरसेवकांचा राजीनामा घेण्यात येणार असल्याची माहिती भाजपच्या विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. अन्य चारजणांना पक्षाकडून संधी दिली जाणार असून, नवीन चारही सदस्यांना पक्षाकडून अडीच वर्षांसाठीच संधी दिली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
भाजप बहुमताने सत्तेत आला आहे. त्यामुळे पक्षाकडून सर्व नगरसेवकांना पदे देणे शक्य नाही. यासह पक्षातील पदाधिकाऱ्यांनाही संघटनेव्यतिरिक्त मनपात पदे देण्यातही अडचणी येत असतात. त्यामुळे दहा महिन्यांचा कार्यकाळ निश्चित करुन काही पदे देण्याचे धोरण सत्ताधारी भाजपने मनपात राबविले आहे. मात्र, स्वीकृत सदस्यांना पूर्ण अडीच वर्ष कार्यकाळ दिल्यामुळे भाजपातील अंतर्गत नाराजी वाढली आहे. पहिल्या टप्प्यात जितका कार्यकाळ स्वीकृत सदस्यांना मिळाला आहे. तितकाच कार्यकाळ दुसऱ्या टप्प्यातदेखील मिळावा, अशी मागणी पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे.
महापौर, उपमहापौर पदांसाठी आतापासूनच रस्सीखेच
महापौर व उपमहापौर पदांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ १८ मार्च रोजी संपणार आहे. त्यामुळे आतापासूनच इच्छुकांकडून मोर्चेबांधणीला वेग आला आहे. पुढील अडीच वर्षांसाठी महापौरपद महिला राखीव असल्याने प्रतिभा देशमुख, सिंधू कोल्हे, उज्ज्वला बेंडाळे, ज्योती चव्हाण यांचे नाव या पदासाठी सर्वात पुढे आहे तर उपमहापौर पदासाठी सुनील खडके यांना पक्षाकडून अजून काही महिन्यांसाठी संधी दिली जाते का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. उपमहापौर पदासाठीच्या इच्छुकांमध्ये सचिन पाटील, नवनाथ दारकुंडे, डॉ. चंद्रशेखर पाटील यांची नावे चर्चेत आहेत.
शिवसेनेकडून दिला जावू शकतो उमेदवार
आगामी महापौर व उपमपहापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश, सत्ताधारी भाजपमधील वाढत्या अंतर्गत गटबाजीच्या पार्श्वभूमीवर मनपातील विरोधी पक्ष शिवसेनेच्या आशा वाढल्या असून, आगामी दोन महिन्यात अनेक महत्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.