मनसेचे सर्व १२ नगसेवक सुरेशदादांच्या गटात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 06:04 IST2018-06-27T06:04:30+5:302018-06-27T06:04:34+5:30
मनसेच्या महापौरांसह सर्व १२ नगरसेवक हे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या गटात दाखल झाले

मनसेचे सर्व १२ नगसेवक सुरेशदादांच्या गटात दाखल
जळगाव : महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या महापौरांसह सर्व १२ नगरसेवक हे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या गटात दाखल झाले असून ते खान्देश विकास आघाडीकडून निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे जळगावमध्ये मनसेला खिंडार पडले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी नाट्यमोडी घडल्या. आगामी महानगरपालिकेची निवडणूक सुरेशदादांच्या नेतृत्त्वाखाली लढविणार आहोत, अशी माहिती स्वत: महापौर तथा मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे यांनी मंगळवारी दिली. त्यामुळे खान्देश विकास आघाडीची ताकद वाढणार आहे.
२०१३ मध्ये महापालिका निवडणुकीत ललित कोल्हे यांच्या नेतृत्त्वाखाली मनसेने तब्बल १२ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर ललित कोल्हे यांना उपमहापौरपद मिळाले. २३ आॅगस्ट २०१७ रोजी त्यांना सुरेशदादा जैन यांनी महापौरपदाची संधी दिली. सुरेशदादा यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याने १ आॅगस्ट रोजी होणारी निवडणुकही त्यांच्या नेतृत्त्वाखाली लढण्याचा निर्णय ललित कोल्हे व त्यांच्यासोबतच्या नगरसेवकांनी घेतला आहे.
सुरेशदादा यांच्या निवासस्थानी मंगळवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना कोल्हे म्हणाले, आम्ही २०१३ मध्ये मनसेच्या तिकिटावर निवडून आलो. मी चार वर्षांपूर्वीच मनसेच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. सध्या मनसेच्या कोणत्याही पदावर नाही. आम्ही सर्व १२ नगसेवक आता सुरेशदादा यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार आहोत. युती झाली तरी अथवा झाली नाही तरी आम्ही त्यांच्या नेतृत्त्वातच निवडणूक लढणार.
महापालिका निवडणुकीबाबत सर्व माहिती वरिष्ठांना पाठविण्यात आली आहे. दोन-तीन दिवसांत मनसेची भूमिका स्पष्ट करण्यात येईल. पक्षातर्फे अनेक जण इच्छूक आहेत.
- अॅड.जमिल देशपांडे,
जिल्हा सचिव, मनसे