अरेच्चा, पोलीस चौकीला लागूनच असलेले बंद घर फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:56 IST2021-02-05T05:56:38+5:302021-02-05T05:56:38+5:30
जळगाव : इच्छादेवी पोलीस चौकीला लागूनच असलेल्या पंचशील नगरात आसिफ खान सुभान खान (४३) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून ...

अरेच्चा, पोलीस चौकीला लागूनच असलेले बंद घर फोडले
जळगाव : इच्छादेवी पोलीस चौकीला लागूनच असलेल्या पंचशील नगरात आसिफ खान सुभान खान (४३) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ७० हजार रुपये रोख व सव्वालाखाचे दागिने असा दोन लाखांच्यावर ऐवज लांबविल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.
अतिशय दाटीवाटी व वर्दळीच्या ठिकाणी घरफोडी झाली आहे. आसिफ खान यांचे किराणा दुकान असून एकाच घरात दुकान व वास्तव्य आहे. पाचोरा येथे मामाच्या मुलाचे लग्न असल्याने पत्नी व तीन मुलांसह शनिवारी रात्री घर व दुकानाला कुलूप लावून पाचोरा येथे गेले होते. गावाला जाताना त्यांनी शेजारच्यांना घराकडे लक्ष ठेवा म्हणून सांगितले होते. रविवारी सकाळी आठ वाजताच शेजारी राहणाऱ्या सलमान नावाच्या तरुणाने फोन करून दुकान व घराचे कुलूप तुटल्याची माहिती दिली. त्यामुळे आसिफ खान यांनी तातडीने घर गाठले असता दोन्ही कुलूप तोडलेले होते तर कपाटही तुटलेले होते. त्यातील दागिने व किराणा दुकानातील गल्ल्यातील ७० हजार रुपये रोख असा ऐवज गायब झालेला होता.
दुकानातही चोरट्यांनी नासधून केल्याचे दिसून आले. याबाबत एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती कळविली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. चोरी झालेल्या वस्तू व रोकड याची माहिती खान यांनी पोलिसांकडे सादर केली.
शेजारीच पोलीस चौकी
ज्या ठिकाणी घटना घडली, त्या ठिकाणापासून अगदी हाकेच्या अंतरावर इच्छादेवी पोलीस चौकी आहे. ही चौकी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्याच अंतर्गत येते. या चौकीवर उपनिरीक्षकाची ड्युटी लावण्यात आलेली आहे, मात्र कधीही तेथे उपनिरीक्षक नसतात, त्याशिवाय रात्रीच्यावेळी कर्मचारीही नसतात. चहा विक्रेत्याकडे येणारे ग्राहकच येथे तासन्तास थांबून असल्याची माहिती या ठिकाणाहून देण्यात आली.