अक्सा नगरातील बाजारात फिजिकल डिस्टन्सिंगची ‘ऐशी की तैशी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:16 IST2021-05-06T04:16:43+5:302021-05-06T04:16:43+5:30

कोरोनाला निमंत्रण देणारा अक्सा नगरातील ‘बुध बाजार’ गर्दीपुढे मनपाचे पथकही हतबल : पाहणी केल्यानंतर ही कारवाई टाळली; पोलिसांचा बंदोबस्त ...

'Aishi Ki Taishi' of Physical Distance in Axa Market | अक्सा नगरातील बाजारात फिजिकल डिस्टन्सिंगची ‘ऐशी की तैशी’

अक्सा नगरातील बाजारात फिजिकल डिस्टन्सिंगची ‘ऐशी की तैशी’

कोरोनाला निमंत्रण देणारा अक्सा नगरातील ‘बुध बाजार’

गर्दीपुढे मनपाचे पथकही हतबल : पाहणी केल्यानंतर ही कारवाई टाळली; पोलिसांचा बंदोबस्त मिळेना

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना, जिल्हा प्रशासन व मनपा प्रशासनाकडून सार्वजनिक ठिकाणांवर गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात आहे. यासह शहरात भरणारे सर्व आठवडा बाजार देखील जिल्हा प्रशासनाने बंद केले असताना शहरातील अक्सा नगर व मास्टर कॉलनी परिसरात बुधवारी भला मोठा बाजार भरला होता. तसेच या ठिकाणी हजारो नागरिकांनी एकाच वेळी गर्दी केल्याचे ही आढळून आले आहे. नागरिकांना प्रशासनाकडून गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात असताना या बाजारात मात्र नागरिकांनी फिजिकल डिस्टन्सिंगची ‘ऐशी की तैशी’ केल्याचे चित्र पहावयास मिळाले.

दर बुधवारी शहरातील अक्सा नगर भागात बुध बाजार नावाचा बाजार नियमितपणे भरत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी व स्वतः मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी या बाजारात जाऊन विक्रेत्यांना व नागरिकांना देखील बाजारात गर्दी करू नये व विक्रेत्यांना या बाजारात येऊच नये, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र, मनपा प्रशासनाच्या या सूचनांकडे दुर्लक्ष करत दर बुधवारी या भागात हा बाजार भरत आहे. बुधवारी देखील सकाळी दहा वाजेपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तसेच गर्दीमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचा कोणताही नियम पाळण्यात आला नाही. यासह एकाही विक्रेत्याने या बाजारात मास्कदेखील घातलेला नव्हता. त्यामुळे हा बाजार कोरोनाला निमंत्रण देणारा ठरत आहे.

प्रचंड गर्दीमुळे मनपाने टाळली कारवाई

बुध बाजारातील गर्दीबाबत काही नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे तक्रारी केल्या, नंतर सकाळी ११ वाजेच्या सुमारास मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली मनपाचे पथक या भागात दाखल झाले. मात्र, या बाजारात हजारो नागरिकांची गर्दी असल्याने, मनपाकडून कारवाई झाल्यास या ठिकाणी गोंधळ निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून कोणतीही कारवाई या ठिकाणी करण्यात आली नाही. मनपाच्या पथकाकडून या भागातील बाजाराचे व्हिडिओ चित्रण करण्यात आले आहे. अक्सा नगर भागातील गल्लीबोळात जिल्हाभरातून विक्रेते दाखल झाले होते, तसेच नागरिकांची देखील प्रचंड गर्दी या भागात झाली होती.

पोलिसांचा बंदोबस्त नसल्याने कारवाई नाही

या बाजारात प्रचंड गर्दी असल्याने व मनपा पथकात केवळ १० ते १२ कर्मचाऱ्यांचा ताफा होता. अशा परिस्थितीत कारवाई करण्यास एकही कर्मचारी धजावला नाही. दरम्यान, अशा बाजारांमध्ये होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त आवश्यक असतो. मात्र, मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकासोबत पोलिसांचा बंदोबस्त नसल्याने ही कारवाई होऊ शकली नाही. दरम्यान, शहरातील पिंप्राळा भागातील बाजारदेखील बुधवारी भरत असतो, या ठिकाणी विक्रेत्यांनी दुकाने थाटू नयेत म्हणून सकाळपासून मनपाचे पथक या ठिकाणी तैनात करण्यात आले होते. यामुळे या भागात बाजार भरू शकला नाही.

Web Title: 'Aishi Ki Taishi' of Physical Distance in Axa Market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.