तब्बल वर्षभरानंतर मनपाकडून दीड कोटीचा निधी महावितरणकडे वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:21 IST2021-09-15T04:21:51+5:302021-09-15T04:21:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाला अडथळा ठरत असलेल्या विद्युत खांब स्थलांतरासाठी मनपाने अखेर महावितरणकडे दीड ...

तब्बल वर्षभरानंतर मनपाकडून दीड कोटीचा निधी महावितरणकडे वर्ग
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाला अडथळा ठरत असलेल्या विद्युत खांब स्थलांतरासाठी मनपाने अखेर महावितरणकडे दीड कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे. मंगळवारी मनपाच्या विद्युत विभागाने दीड कोटी रुपयांचा धनादेश महावितरणकडे वर्ग केला आहे. गेल्या वर्षभरापासून या निधीच्या प्रश्नावरून हे काम थांबले होते. एकीकडे मनपाने दीड कोटी रुपयांचा निधी महावितरणकडे वर्ग केला असला तरी काम सुरू करण्याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना फारसे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.
गेल्या वर्षभरापासून शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम थांबले आहे. प्रशासकीय यंत्रणेच्या ढिसाळ कामामुळेच तब्बल ५ लाख नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या प्रश्नाबाबत ‘लोकमत’ने सातत्याने प्रश्न मांडून मनपा, महावितरण प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधून घेतले. ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तत्काळ या निधीची राज्य शासन व विभागीय आयुक्तांकडून मंजुरी घेऊन, निधी वर्ग करण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. आता निधी वर्ग झाल्याने विद्युत खांब हटविण्याच्या कामाला लवकरच सुरुवात व्हावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य जळगावकर व्यक्त कऱत आहेत.
महावितरणच्या अधिकाऱ्यांचा ‘जळफळाट’
मनपाने हा निधी वर्ग केल्यानंतर महावितरणचे कार्यकारी अभियंता फारुक शेख यांच्याशी संपर्क साधून विद्युत खांब हटविण्याच्या कामाला सुरुवात केव्हा होईल, याबाबत विचारणा केली असताना, फारूक शेख यांना ५ लाख नागरिकांचा दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या या प्रश्नाबाबत कोणतेही गांभीर्य नसल्याचे दिसून आले. तसेच ‘लोकमत’कडून सातत्याने हा प्रश्न मांडून प्रशासकीय यंत्रणेला धारेवर धरल्याने फारुक शेख यांचा जळफळाट झालेला दिसून आला. तसेच मनपाने निधी वर्ग केल्यावरदेखील निधी वर्ग झाला नसल्याचे सांगत, कामाला केव्हा सुरुवात होईल याबाबत उत्तर देण्याचेही शेख यांनी टाळले.
कोट...
५ लाख नागरिकांच्या प्रश्नाबाबत आता महावितरण प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. दीड कोटींचा निधी तत्काळ वर्ग करण्याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा करून हा निधी मंजूर करून आणला. आता महावितरणच्या अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करून, कामाला लवकरच सुरुवात करणे गरजेचे आहे.
- गुलाबराव पाटील, पालकमंत्री
महावितरणकडूनच हे काम होणे गरजेचे होते. महावितरण प्रशासनाच्या ढिसाळ यंत्रणेमुळे या पुलाचे काम थांबले. मनपाने नागरिकांचा विचार करून, आपल्याकडील निधी महावितरणकडे वर्ग केला आहे. मात्र, महावितरणच्या अधिकाऱ्यांचे ढिसाळ काम पाहता या कामाला लवकर सुरुवात होईल हे सांगणेही कठीण आहे. आता आठवडाभरात या कामाला सुरुवात झाली नाही तर महावितरणविरोधात जोरदार आंदोलन करू.
- ॲड. दिलीप पोकळे, नगरसेवक