प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यानंतर काँग्रेसच्या हालचाली थंडावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:17 IST2021-07-27T04:17:19+5:302021-07-27T04:17:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दौऱ्यानंतर काँग्रेसमध्ये एक उभारी येण्याचे चित्र निर्माण झाले होते; ...

प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यानंतर काँग्रेसच्या हालचाली थंडावल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दौऱ्यानंतर काँग्रेसमध्ये एक उभारी येण्याचे चित्र निर्माण झाले होते; मात्र प्रदेशाध्यक्षांचा दौरा आटोपताच काँग्रेसमधील निवडीच्या हालचाली थंडावल्या आहेत. आता प्रदेश कार्यकारिणीची निवड झाल्यानंतरच जिल्ह्यातील संघटनात्मक बदलांच्या हालचाली होतील, अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. त्यातच शहराध्यक्ष म्हणून नवीन चेहऱ्याच्या शोधात काँग्रेस पदाधिकारी असल्याने अंतर्गत धुसफूस वाढण्याची शक्यता आहे.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांची एक मोठी बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह पक्षश्रेष्ठींच्या सोबत मुंबई येथे पार पडली होती. या बैठकीत जिल्ह्यातील संघटनात्मक बदलांवर चर्चा झाली होती. त्यावेळी आमदार शिरीष चौधरी यांना सर्वाधिकार देण्यात आले होते. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा दौराही पार पडला. यावेळी त्यांनी स्वबळाच्या नाऱ्याचा पुनरुच्चार केला होता. अशा स्थितीत संघटनात्मक बदलांसाठी काँग्रेसला वेळच नसल्याने आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच सहकारच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची संघटना कितपत मजबूत असेल असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. शहराध्यक्ष निवडीसंदर्भात प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यात चर्चा होणार होती; मात्र आम्ही नावे अद्याप जाहीर करू शकत नाही, असे आमदार शिरीष चौधरी यांनी पत्रकार परिषदेत त्यावेळी घोषित केले होते.
नवीन चेहऱ्याचा शोध
शहराध्यक्षपदासाठी अनेक जण इच्छुक असताना महापालिकेच्या दृष्टीने नवीन चेहऱ्याचा शोध खुद्द आमदार शिरीष चौधरी यांच्याकडून घेतला जात असल्याचे सूत्रांकडून समजते. पक्षातील उपाध्यक्ष श्याम तायडे, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, ज्ञानेश्वर कोळी अशी काही नावे इच्छुकांमध्ये घेतली जात आहेत.