सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीनंतर जिल्हा बँकेसाठीच्या हालचाली पुन्हा मंदावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:20 IST2021-09-14T04:20:38+5:302021-09-14T04:20:38+5:30

भाजपची सर्वपक्षीय तोडग्यासह स्वबळाचीही तयारी : ‘त्या’ सहा जागांचा तिढा कायम राहण्याची शक्यता लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा ...

After the meeting of all party leaders, the movement for the district bank slowed down again | सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीनंतर जिल्हा बँकेसाठीच्या हालचाली पुन्हा मंदावल्या

सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीनंतर जिल्हा बँकेसाठीच्या हालचाली पुन्हा मंदावल्या

भाजपची सर्वपक्षीय तोडग्यासह स्वबळाचीही तयारी : ‘त्या’ सहा जागांचा तिढा कायम राहण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हा बँकेसाठी मतदार यादी अंतिम करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून, २५ सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्याआधी जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय पॅनल तयार करण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्यासाठी बैठक ही पार पडली व जागावाटपासाठी सर्वपक्षीय नेत्यांची समितीदेखील तयार झाली आहे. मात्र, समिती तयार झाल्यानंतर जिल्हा बँकेसाठीच्या हालचाली पुन्हा मंदावल्या असून, भाजपकडून यासाठी प्रतिसाद दिला जात नसल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

पहिल्या बैठकीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे निर्णय घेण्यासाठी चारही पक्षांच्या ८ सदस्यांचा समावेश असलेली कोअर कमिटी गठित करण्यात आली होती. कमिटीत शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील, भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री एकनाथ खडसे, गुलाबराव देवकर आणि काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी व ॲड. संदीप पाटील यांचा समावेश आहे. मात्र, समिती स्थापन झाल्यापासून समिती सदस्यांची आतापर्यंत एकही बैठक झालेली नाही.

खडसे राजस्थानहून आल्यावर बैठक

माजी मंत्री एकनाथ खडसे हे उपचारासाठी राजस्थानला गेले असल्यामुळे ही बैठक रखडल्याचे कारण पुढे केले जात आहे. खडसे हे राजस्थानला गेले असल्याने समिती सदस्यांची बैठक होऊ शकली नव्हती. मात्र, आठवडाभरात सर्वपक्षीय समिती सदस्यांची बैठक होणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्याठिकाणची पाहणी, शेतकऱ्यांचे प्रश्न, नुकसानीचा आढावा घेणे या कामांना अधिक प्राधान्य देणे गरजेचे होते. त्यामुळे ही बैठक होऊ शकली नव्हती, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

६ जागांमुळे डोकेदुखी वाढणार

जिल्हा बँकेसाठी सोसायटी मतदारसंघाव्यतिरिक्त असलेल्या इतर सहा मतदारसंघातील जागांवरून सर्वपक्षीय नेत्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. या सहा जागांमध्ये २ महिला, १ ओबीसी, १ एनटी, १ एसटी व १ इतर सहकारी संस्था मतदारसंघाचा समावेश आहे. सोसायटी मतदार संघातील १५ जागांवर सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत झाले तरी सहा जागांबाबत होणे कठीण असल्याने या ६ जागांवरून सर्वपक्षीय पॅनल फिस्कटण्याचीही शक्यता आहे. सद्य:स्थितीत ६ जागांपैकी ३ जागा भाजप, २ राष्ट्रवादी, तर १ शिवसेनेकडे आहे. अशा परिस्थितीत समान वाटपाचा निर्णय झाल्यास भाजपला एक जागा सेनेसाठी सोडावी लागणार आहे. मात्र, भाजप गेल्यावेळेप्रमाणेच तीन जागांसाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Web Title: After the meeting of all party leaders, the movement for the district bank slowed down again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.