जिल्हा बँकेनंतर आता ग.स. सोसायटीच्या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:17 IST2021-09-03T04:17:37+5:302021-09-03T04:17:37+5:30

स्थगिती उठल्याने लवकरच जाहीर होऊ शकतो निवडणूक कार्यक्रम : पाच पॅनलमध्ये लढत होण्याची शक्यता : सत्ता टिकविण्याचे सहकार गटासमोर ...

After District Bank, now G.S. Formation of the Society for Elections | जिल्हा बँकेनंतर आता ग.स. सोसायटीच्या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी

जिल्हा बँकेनंतर आता ग.स. सोसायटीच्या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी

स्थगिती उठल्याने लवकरच जाहीर होऊ शकतो निवडणूक कार्यक्रम : पाच पॅनलमध्ये लढत होण्याची शक्यता : सत्ता टिकविण्याचे सहकार गटासमोर आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - कोरोनामुळे थांबलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम आता केव्हाही जाहीर होण्याची शक्यता आहे. एकीकडे आता जिल्हा बँकेची तयारी सुरु असताना, जिल्ह्यातील सर्वात मोठी सहकारी संस्था असलेल्या ग.स. सोसायटीचा निवडणूक कार्यक्रम देखील लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. ३१ ऑगस्टपर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुकांवर लावण्यात आलेल्या स्थगितीची मुदत संपली असल्याने आता ‘सरकारी बाबूंची’ सोसायटी म्हणून ओळख असलेल्या ग.स.सोसायटीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.

ग.स.सोसायटीच्या संचालक मंडळाची मुदत जून २०२० मध्येच संपुष्टात आली होती. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही निवडणूक स्थगित ठेवण्यात आली होती. या संस्थेवर सद्य स्थितीत प्रशासक मंडळाद्वारे कारभार सुरु असून, प्रशासक नेमल्यानंतर सहा महिन्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा लागतो. आता प्रशासक नेमून देखील सहा महिन्यांपेक्षा अधिकचा काळ झाला आहे. त्यामुळे ग.स. सोसायटीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. यासाठी सहकार गटाकडून देखील शासनाला निवेदन देण्यात आले आहे.

पाच पॅनलमध्ये होऊ शकते निवडणूक

१. सहकार गट - उदय पाटील

२. लोक सहकार गट अ - विलास नेरकर

३.लोक सहकार गट ब - मनोज पाटील

४. प्रगती गट - रावसाहेब मांगो पाटील

५. लोकमान्य गट - गंजीधर पवार

सहकार गटासमोर सत्ता टिकविण्याचे आव्हान

१. ग.स.सोसायटीमध्ये अनेक वर्षांमध्ये सहकार गटाचा एकछत्री अंमल राहिला आहे. मात्र, २०१५ मध्ये सर्व जागा जिंकल्यानंतर २०१९ मध्ये ग.स.सोसायटीतील सत्ताधारी सहकार गटात उभी फूट पडली होती. उदय पाटील यांच्यासह ९ संचालक सहकार गटासोबत राहिले होते. तर, सहकार गटातून फुटून लोक सहकार गटाची सत्ता सोसायटीत आली होती.

२. मात्र, वर्षभरातच लोक सहकार गटात फूट पडून मनोज पाटील व विलास नेरकर यांनी आपला वेगळा गट स्थापन केला. त्यामुळे फुटीच्या पार्श्वभूमीवर सहकार गटाला आपली सत्ता कायम ठेवण्याचे आव्हान पार पाडावे लागणार आहे.

३. सहकार गटाचे अध्यक्ष बी.बी. पाटील यांनी आपले अध्यक्षपद सोडून आता उदय पाटील यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे. उदय पाटील हे देखील ग.स. सोसायटीतील अनुभवी संचालक असून, आतापासूनच त्यांनी संपर्क व मेळाव्यांद्वारे निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.

विद्यमान संचालकांची स्थिती

एकूण संचालक - २१

सहकार गट - ९

लोक सहकार गट अ - ५

लोक सहकार गट ब - ४

निवृत्त झालेले संचालक - ३

कडवे आव्हान देण्यासाठी विरोधकही सज्ज

ग.स. सोसायटीमध्ये एकूण ४० हजारपेक्षा अधिक सभासद आहेत. अनेक वर्षांपासून सहकार गटाचा एकछत्री अंमल सोसायटीवर असला तरी आता सहकार गटात पडलेल्या फुटीचा फायदा घेण्यासाठी विरोधक देखील सज्ज झाले आहेत. लोकमान्य गटाचे नेतृत्व हनुमंतराव पवार यांच्याकडेच असायचे, मात्र त्यांचे निधन झाल्यामुळे आता गंजीधर पाटील यांच्याकडे लोकमान्य पॅनलचे नेतृत्व राहणार आहे. प्रगती पॅनलसह लोक सहकार नेरकर गट व मनोज पाटील गटाकडून देखील मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. सद्य स्थितीत सहकार गटाने आघाडी घेतली असली तरी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ग.स.च्या घडामोडींना वेग येणार आहे.

Web Title: After District Bank, now G.S. Formation of the Society for Elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.