अखेर ‘त्या’ २० वादग्रस्त गुरांचा ताबा गोशाळेकडेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:22 IST2021-08-21T04:22:04+5:302021-08-21T04:22:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धरणगाव : येथील ‘त्या’ २० गुरांचा ताबा गोशाळेकडे देण्याबाबतचा निर्णय येथील न्यायालयाने दिला आहे. येथे ...

अखेर ‘त्या’ २० वादग्रस्त गुरांचा ताबा गोशाळेकडेच
लोकमत न्यूज नेटवर्क
धरणगाव : येथील ‘त्या’ २० गुरांचा ताबा गोशाळेकडे देण्याबाबतचा निर्णय येथील न्यायालयाने दिला आहे.
येथे २० जुलै रोजी पोलिसांनी २० गुरे कुरेशी मोहल्ल्यातून जप्त केली होती. त्याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी श्रीपाद पांडे यांनी दिनांक ३१ जुलै रोजी रात्री १०:३० वाजता न्यायालयाचे दार ठोठावले होते. त्यावेळेस न्यायालयाने पोलिसांना अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी आरोपी निष्पन्न करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. तर आरोपींनी ही गुरे ताब्यात मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यात कामधेनू गो सेवा मंडळ, धरणगाव यांनादेखील सामनेवाले करण्यात आले होते. त्यात गोशाळेच्या वतीने अध्यक्ष ह.भ.प. सी. एस. पाटील हे हजर झाले व त्यात गोशाळेच्या वतीने ॲड. राहुल एस. पारेख व ॲड. वसंतराव भोलाणे यांनी युक्तिवाद केला. तो युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने १७ ऑगस्ट रोजी आदेश केला की, अर्जदार यांची मालकी सिद्ध होत नाही. तसेच ही गुरे लहान वयाची असल्याने ती शेती उपयोगी नाहीत, त्यामुळे त्यांचा ताबा अर्जदार आरोपींकडे देता येणार नाही. त्यांचा ताबा कामधेनू गो सेवा मंडळ या गोशाळेकडेच कायम ठेवण्यात यावा, असा आदेश न्यायालयाने पारित केला. या आदेशाने गोप्रेमीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
न्यायालयाच्या अशा आदेशाने चुकीच्या गोष्टींना आळा बसेल. गावातील वातावरण शांत राहण्यास मदत होईल. बऱ्याच दिवसांपासून गावात चर्चेचा विषय होता. आजच्या आदेशाने चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
-ॲड. राहुल पारेख