लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून किरकोळ चढ-उतार होत असलेल्या सोने-चांदीच्या भावात वाढ होऊन १२ दिवसांनंतर चांदी पुन्हा एकदा ७० हजार रुपये प्रति किलोच्या पुढे पोहचली आहे. अशाच प्रकारे सोन्याच्याही भावात वाढ होऊन ते ४८ हजाराच्या पुढे गेले आहे. डॉलरचे दर वाढल्याने सोने-चांदीच्या भावात वाढ होत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
बाजारपेठ अनलॉक झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांचा अपवाद वगळता सोने-चांदीच्या भावात घसरण होत होती. मात्र दोन दिवसांपासून या मौल्यवान धातूंचे भाव वाढत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधादरम्यान कमोडिटी मार्केटमध्ये सोने-चांदीत भाववाढ होत राहिली. अनलॉकनंतर सुवर्णपेढ्या सुरु झाल्या व भाववाढ होत जाऊन १० जून रोजी चांदी ७४ हजार रुपये प्रति किलोवर पोहचली होती. मात्र ११ रोजी त्यात ५०० रुपयांची घसरण होऊन ती ७३ हजार ५०० रुपयांवर आली. त्यानंतर सातत्याने घसरण होत जाऊन १८ जून रोजी ७१ हजार ५०० रुपयांवर आली व १९ रोजी एकाच दिवसात दोन हजाराची घसरण होऊन ती ६९ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली. ही घसरण होत जाऊन २८ जून रोजी ६९ हजारावर आली. त्यानंतर मात्र जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी १ जुलै रोजी चांदी ७० हजाराच्या पुढे जाऊन ७० हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली. २ जुलै रोजी मात्र त्यात ५०० रुपयांची घसरण होऊन ती ७० हजार रुपये प्रति किलोवर आली.
१९ जूनपूर्वी ७० हजाराच्या पुढे असलेली चांदी या भाववाढीमुळे १२ दिवसांनतर १ जुलै रोजी पुन्हा ७० हजाराच्या पुढे गेली. अशाच प्रकारे सोन्याच्याही भावात वाढ होत जाऊन २ जुलै रोजी सोने ४८ हजार ४०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले.
डॉलर दरवाढीचा परिणाम
भारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलरचे दर वाढत असल्याने सोने-चांदीत वाढ होत असल्याचे सांगितले जात आहे. जून महिन्यात ७३ ते ७४ रुपयांवर असलेल्या डॉलरचे दर जुलै महिना सुरू होताच २ जुलै रोजी त्याचे दर ७४.८० रुपयांवर पोहचले आहे. त्यामुळे सोने-चांदी वधारत आहे.