लवकरचं होणार कुलगुरू पदासाठीची जाहिरात प्रसिध्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:12 IST2021-07-24T04:12:20+5:302021-07-24T04:12:20+5:30
जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठीची जाहिरात ...

लवकरचं होणार कुलगुरू पदासाठीची जाहिरात प्रसिध्द
जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठीची जाहिरात येत्या दोन ते तीन दिवसात प्रसिध्द होणार आहे. विशेष म्हणजे, जाहिरात प्रसिध्द होण्याआधी कुलपतींकडून नोडल अधिका-याची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती विद्यापीठ सूत्राकडून मिळाली आहे.
कार्यकाळ संपण्यापूर्वी प्रा.पी.पी.पाटील यांनी कुलगुरू पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांच्या जागी सद्यस्थितीला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. दरम्यान, आता नवीन कुलगुरूंच्या निवड प्रक्रियेला गती आली आहे. काही दिवसांपूर्वी कुलपतींकडून 'कुलगुरू शोध समिती' गठीत करण्यात आली आहे.
तांत्रिक बाबींच्या पूर्ततेसाठी कुलसचिव मंत्रालयात
कुलगुरू निवड प्रक्रियेच्या हालचालींना वेग आला असून आवश्यक कागदपत्रांची व तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याची प्रक्रिया सुरू असून यासाठी प्रभारी कुलसचिव शामकांत भादलीकर हे शुक्रवारी मंत्रालयात असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळाली.
कुलगुरू शोध समितीत यांचा समावेश
जुलै महिन्याच्या सुरूवातीला कुलपतींकडून कुलगुरू शोध समिती गठीत करण्यात आली होती. समितीमध्ये अध्यक्ष म्हणून जम्मु आणि काश्मिरचे सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश महेश मित्तल तसेच सदस्य म्हणून खडगपूर आयआयटीचे विरेंद्रकुमार तिवारी, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओमप्रकाश गुप्ता यांचा समावेश आहे.