भाजप गटनेतेपदी ॲड. दिलीप पोकळे यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:21 IST2021-07-07T04:21:45+5:302021-07-07T04:21:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेत भाजपच्या बंडखोर नगरसेवकांनी भाजपला धक्का देत आता गटनेते पदावर देखील आपला हक्क सांगितला ...

भाजप गटनेतेपदी ॲड. दिलीप पोकळे यांची नियुक्ती
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेत भाजपच्या बंडखोर नगरसेवकांनी भाजपला धक्का देत आता गटनेते पदावर देखील आपला हक्क सांगितला आहे. मंगळवारी भाजपच्या २९ बंडखोर नगरसेवकांनी महापौर जयश्री महाजन यांना पत्र देऊन भाजपच्या गटनेतेपदी ॲड. दिलीप पोकळे तर उपगटनेतेपदी चेतन सनकत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर भाजपचे गटनेते भगत बालाणी यांची गटनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आल्याचा दावा उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी केला आहे.
भाजपच्या फुटीर नगरसेवकांनी स्वबळावर पक्ष बैठक घेत विद्यमान गटनेते भगत बालाणी व उपगटनेते राजेंद्र पाटील यांची हकालपट्टी करीत स्वतःच्या गटाच्या सदस्यांची नेमणूक केली आहे. सभागृह नेते ललित कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली १७ जून रोजी घेतलेल्या बैठकीत गटनेतेपदी दिलीप पोकळे व उपगटनेते चेतन सनकत यांची नियुक्ती केल्याचे पत्र उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या नेतृत्वाखाली इतर सदस्यांनी महापौर जयश्री महाजन यांना मान्यतेसाठी दिले आहे.
भाजपची भूमिका आज जाहीर होणार
बंडखोर नगरसेवकांनी आपली खेळी खेळत भाजपचा गटनेते पदावर आपला दावा केला आहे. दरम्यान, सोमवारी भाजपने देखील बंडखोरांच्या प्रस्तावाआधीच महापौर व विभागीय आयुक्तांना पत्र सादर करून बंडखोर नगरसेवकांचे गटनेतेपद मान्य करू नये अशी मागणी केली होती; मात्र मंगळवारी बंडखोर नगरसेवकांनी महापौरांना पत्र देऊन गटनेतेपद आपल्याकडे खेचून आणले आहे. या प्रकरणावर आता भाजपची कोणतीही भूमिका स्पष्ट झाली नसली तरी बुधवारी याबाबत भाजप आपली भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे.
कोट..
बंडखोर नगरसेवक अपात्रतेच्या भीतीमुळे काहीतरी नवीन उपद्रव करीत आहेत. नियमानुसार हे गटनेतेपद मान्य केले जाणार नसून, भाजप आपली भूमिका बुधवारी स्पष्ट करेल. भाजपच्या अधिकृत गटनेतेपदी अजूनही मी कायम आहे.
- भगत बालाणी , गटनेते, भाजप
नियमानुसार ठराव करून भाजपच्या गटनेतेपदी दिलीप पोकळे यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत सभागृहाने त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबाबतचा ठराव भाजपच्या २९ नगरसेवकांनी मान्य करून घेतला आहे.
- कुलभूषण पाटील, उपमहापौर