एमआयडीसीत ट्रक मागे घेताना प्रौढाचा दबून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:16 IST2021-04-09T04:16:14+5:302021-04-09T04:16:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ट्रक मागे घेत असताना गणेश पांडू चव्हाण (वय ४५, रा. लियानी, ता. एरंडोल, ...

एमआयडीसीत ट्रक मागे घेताना प्रौढाचा दबून मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ट्रक मागे घेत असताना गणेश पांडू चव्हाण (वय ४५, रा. लियानी, ता. एरंडोल, ह.मु. पोलीस कॉलनी) या मजुराचा दबून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ८ वाजता एमआयडीसीत घडली.
गणेश चव्हाण हे एमआयडीसीतील डी-सेक्टरमधील कक्कड उद्योग दालमिल कंपनीत हमाल म्हणून एक वर्षापासून कामाला होते. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते ७ वाजता कामावर गेले. दरम्यान ७.४५ वाजेच्या सुमारास ट्रक (क्र. जी.जे. ३४ टी ९४७७) माल उतरविण्यासाठी मागे घेण्यात येत होता. त्या वेळी गणेश चव्हाण हे ट्रकच्या मागच्या बाजूला उभे होते. यात चव्हाण हे भिंत आणि ट्रकच्या मध्ये दबले गेले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडताच ट्रकचालक ट्रक सोडून घटनास्थळाहून पसार झाला आहे. दालमिल कंपनीच्या मालकाने तातडीने जखमीस खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले.
अपघात होताच मयत गणेश चव्हाण यांच्या नातेवाइकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठी गर्दी केली होती. कुटुंबीयातील सदस्यांनी मृतदेह पाहून हंबरडा फोडला होता. मयताच्या पश्चात पत्नी निर्मलाबाई, गजानन, गोविंदा आणि सनी ही तीन मुले आणि दोन विवाहित मुली असा परिवार आहे.