प्रौढावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:13 IST2021-06-21T04:13:01+5:302021-06-21T04:13:01+5:30
मुक्ताईनगर : बाहेर गावावरून आलेल्या चार सराईत गुन्हेगारांनी एका प्रौढ इसमावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना शहरातील प्रवर्तन चौक ...

प्रौढावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला
मुक्ताईनगर : बाहेर गावावरून आलेल्या चार सराईत गुन्हेगारांनी एका प्रौढ इसमावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना शहरातील प्रवर्तन चौक भागात रविवारी सकाळी १०.३० वाजता घडली. या हल्ल्यात ओंकार विठोबा पाटील (वय ५५, रा. मुक्ताईनगर) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना जळगाव येथे हलविण्यात आले आहे. घटनास्थळावरून तीन हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, एक हल्लेखोर गोंधळात पसार होण्यात यशस्वी झाला आहे.
शहरातही प्रवर्तन चौक परिसरात भुसावळ व बऱ्हाणपूर येथील चार सराईत गुन्हेगारांनी देशी दारू समोरील दुकानांच्या बाहेर गोंधळ केला. त्यांना हटकले म्हणून या गुन्हेगारांनी प्रौढ ओंकार विठोबा पाटील व सागर ओंकार पाटील (दोघे रा. भोई वाडा, मुक्ताईनगर) यांच्याशी वाद घालून त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने प्राण घातक हल्ला केला. या हल्ल्यात ओंकार पाटील यांच्या मानेवर खोलपर्यंत धारदार शास्त्राची जखम झाली आणि मोठा रक्तस्त्राव सुरू झाला. त्यांना वाचविण्यासाठी धावपड सुरू असताना हल्लेखोरांनी दहशत निर्माण करण्यासाठी चिथावणीखोर वक्तव्य सुरू केले. यावरून संतप्त जमावाने हल्लेखोरांना चांगलाच चोप दिला.
यादरम्यान कोरोना गस्तीवर असलेले पोलीस निरीक्षक खताड काही क्षणातच घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीवर नियंत्रण मिळवत त्यांनी रमजानखान अय्युबखान (वय २१, रा.बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश), शाहरूख आजम शेख (वय २३) व शिवम गोपाळ ठाकूर (वय २२, रा.भुसावळ) या तिघा हल्लेखोरांना ताब्यात घेतले.
गंभीर जखमी झालेले ओंकार पाटील यांना सलग रक्तस्त्राव होत असल्याने त्यांना जळगाव हलविण्यात आले आहे, तर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तिघा आरोपींना ताब्यात ठेवले आहे. गंभीर जखमी प्रौढ जवाब देण्याच्या परिस्थितीत नसल्याने याबाबत उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. ताब्यात घेतलेले हल्लेखोर सराईत असून, त्यांच्या नावांची खात्री पोलीस करीत आहेत.