प्रगतीपुस्तकावरील वर्गोन्नत उल्लेखाने मिळणार पुढच्या वर्गात प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:27 IST2021-05-05T04:27:24+5:302021-05-05T04:27:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनामुळे गेल्या वर्षभरात काही विद्यार्थ्यांना ऑनलाइन, तर काही विद्यार्थ्यांना ऑफलाइन शिक्षण मिळाले आहे. अशाच ...

प्रगतीपुस्तकावरील वर्गोन्नत उल्लेखाने मिळणार पुढच्या वर्गात प्रवेश
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनामुळे गेल्या वर्षभरात काही विद्यार्थ्यांना ऑनलाइन, तर काही विद्यार्थ्यांना ऑफलाइन शिक्षण मिळाले आहे. अशाच बऱ्याच शाळांमध्ये अभ्यासक्रम पूर्ण शिकवून झालेला नाही. परिणामी, राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापन करणे शक्य नाही. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापन न करता सरसकट उत्तीर्ण करून पुढच्या वर्गात पाठविण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने घेतला. त्यामुळे इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीपुस्तकावर वर्गोन्नत असा उल्लेख असणार आहे.
मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शाळा बंद झाल्या होत्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले. संपूर्ण शैक्षणिक वर्ष उलटले, पण इयत्ता पहिली ते चौथीच्या शाळा उघडल्या नाहीत. इतर वर्गांना सुरुवात झाली. मात्र, तेही एक ते दीड महिना. त्यानंतर पुन्हा कोरोनाची लाट आल्यामुळे शाळा बंद झाल्या. परिणामी, वार्षिक मूल्यमापन करणे शक्य नसल्यामुळे विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. यासाठी विद्यार्थ्यांच्या प्रगतीपुस्तकावर वर्गोन्नतचा उल्लेख असणार आहे.
विद्यार्थिसंख्या-
इयत्ता पहिली
मुले : ४०,६३४
मुली : ३५,८८०
=========
इयत्ता दुसरी
मुले : ४२,३६६
मुली : ३६,९४७
=========
- इयत्ता तिसरी
मुले : ४२,७५४
मुली : ३५,१६४
=========
- इयत्ता चौथी
मुले : ४३,७६७
मुली : ३६,२८३
=========
प्रगतीपुस्तक बदलणार
प्रगतीपुस्तकावरसुद्धा बदल झालेले पालकांना पाहायला मिळणार आहे. वर्षभर विद्यार्थी शाळेत उपस्थित नसल्यामुळे उपस्थिती, दिवस, उंची, वजन, तसेच श्रेणी आदी उल्लेख प्रगतीपुस्तकावर नसणार. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे, त्यांच्या प्रगतीपुस्तकावरसुद्धा शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार कुठल्या पद्धतीने उत्तीर्ण केले त्याचा उल्लेख असेल.
=========
- विद्यार्थी प्रतिक्रिया
मध्यंतरी शाळा उघडल्या होत्या. पहिली ते चौथीच्या वर्गांनासुद्धा लवकर सुरुवात होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे शाळा बंद झाल्या. घरात अभ्यास कमी होतो.
- अक्षय माळी, विद्यार्थी
========
स्वाध्याय उपक्रम छान आहे. नियमित त्या उपक्रमात सहभाग नोंदवितो; पण मागील आठवड्यात प्रश्न उपलब्ध झाले नाहीत. आता घरात बसूनसुद्धा कंटाळा आलाय. संसर्गाचे प्रमाण कमी होताच शाळा सुरू करण्यात याव्यात.
- संदीप पाटील, विद्यार्थी
=======
आता शाळांना सुट्या जाहीर झाल्या आहेत. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी विविध ऑनलाइन उपक्रम घ्यावेत. वर्षभर शाळा बंद असल्यामुळे अभ्यासावर परिणाम झाला आहे.
- हर्षल सोनवणे, विद्यार्थी