प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नदीकाठच्या गावांना भेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:22 IST2021-09-09T04:22:11+5:302021-09-09T04:22:11+5:30

गिरणा काठावरील पेठ स्मशानभूमी भागात, वढधे, वाडे गावालगत भिल्ल वस्तीतील झोपडपट्टी भागात, तितूर नदीकाठालगत कजगाव, भोरटेक, पासर्डी आदी गावांना ...

Administrative officials visit riverside villages | प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नदीकाठच्या गावांना भेटी

प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नदीकाठच्या गावांना भेटी

गिरणा काठावरील पेठ स्मशानभूमी भागात, वढधे, वाडे गावालगत भिल्ल वस्तीतील झोपडपट्टी भागात, तितूर नदीकाठालगत कजगाव, भोरटेक, पासर्डी आदी गावांना तहसीलदार सागर ढवळे, सहायक गटविकास अधिकारी संजय लखवाल आदी अधिकाऱ्यांनी भेट देऊन आढावा घेतला. नदीकाठच्या घर, झोपडीमालकांना पुराचे पाणी वाढल्यास स्थलांतरित करावे. गुरे, ढोरे सोयीच्या ठिकाणी हलवावे, काळजी घ्यावी, अशा सतर्कतेच्या सूचना नागरिकांना देण्यात आल्या.

घरमालकांना स्थलांतरित करण्यासाठी त्याच गावातील मंगल कार्यालये, शाळांमध्ये सोयी करण्यात आल्या आहेत. या गावांमध्ये सतर्कतेबाबत दवंडीही देण्यात आल्या आहेत. ७ रोजी सततच्या पावसामुळे खेडगाव व येथे अंशत: प्रत्येकी एक घराची पडझड झाली असून घरांचे नुकसान झाले आहे. तलाठ्यामार्फत या घरांचे नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत, अशी माहिती भडगाव तहसीलदार सागर ढवळे यांनी दिली.

वाडे गिरणा नदीकाठी भिल्ल झोपडपट्टी भागात पुराचे पाणी शिरल्याने ग्रामस्थांना तेथून हलविण्यात आले. या भागाची तहसीलदार सागर ढवळे, सहायक गटविकास अधिकारी संजय लखवाल, तलाठी रत्नदीप माने यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी यशवंत पाटील, कोतवाल आबा मोरे यांचेसह नागरिक हजर होते. तसेच वाडे ते टेकवाडे दरम्यान पुलावर गिरणेचे पुराचे पाणी वाढल्याने वाहनधारक, नागरिकांना मार्ग काढावा लागला. नंतर दुपारहून पाणी ओसरल्यावर वाहनधारकांसह नागरिकांचा वापर सुरू झाला. ७ रोजी व ८ रोजीही सकाळपासून पाऊस कमी अधिक सुरूच होता.

गोंडगाव महसूल मंडळात ७० मिमी., आमडदे महसूल मंडळात २० मिमी, कोळगाव महसूल मंडळात ३१ मिमी, भडगाव महसूल मंडळात ७८ मिमी पाऊस झाला आहे. एकूण पाऊस १९९ मिमी झाला आहे. सरासरी ४९.७५ मिमी पाऊस झाला आहे. तालुक्यात आतापर्यंत एकूण ५९० मिमी पाऊस झाल्याची महसूल प्रशासनाने नोंद केली आहे.

फोटो —

सावदे ता. भडगाव गिरणेवरील पूल परिसरात पाहणी करताना भडगाव तहसीलदार सागर ढवळे, सहायक गटविकास अधिकारी संजय लखवाल, तलाठी रत्नदीप माने आदी.

Web Title: Administrative officials visit riverside villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.