आदिवासी संस्कृतीला सुगम संगीताची जोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:17 IST2021-09-19T04:17:17+5:302021-09-19T04:17:17+5:30
पुंडलिक कोल्हटकर भारतीय शास्त्रीय संगीतात गायन-वादन-नृत्याद्वारे कला प्रदर्शनाने भाव उत्कटता, गायकाचे कला सादरीकरण एक आनंदी पर्व असते. प्रेम आणि ...

आदिवासी संस्कृतीला सुगम संगीताची जोड
पुंडलिक कोल्हटकर
भारतीय शास्त्रीय संगीतात गायन-वादन-नृत्याद्वारे कला प्रदर्शनाने भाव उत्कटता, गायकाचे कला सादरीकरण एक आनंदी पर्व असते. प्रेम आणि जीवन म्हणजे संगीत! संगीताचे सौंदर्य रसिकांशी आणि रसिकांपर्यंत स्वरधारा पोहोचविणारा प्रवाह असतो कलावंत! असेच एक संगीत क्षेत्रातील नाव म्हणजे सुनीता चंद्रशेखर चव्हाण. ‘‘तुझ्या शब्दातून ओवी अभंगाचे मोती वेचून केली सरस्वतीची आरती’’ हीच पवित्र भावना मनामध्ये जपून खान्देशातील नंदुरबार शहरात सुनीता चव्हाण यांची संगीत सेवा ४० वर्षांपासून अविरत सुरू आहे.
नंदुरबारात आदिवासी संस्कृतीचा मोठा वारसा आहे. सातपुड्याच्या रांगेत वसलेले हे शहर, येथेच सुनीता चव्हाण यांची शास्त्रीय आणि सुगम संगीत शिकवण्याची सेवा सुरू आहे. त्यांना हा संगीत कलेचा वारसा त्यांच्या आईकडून आला, त्यांची आई कलावतीदेवीच्या मंदिरात भजन सेवा करीत असे.
सुनीता यांचे शास्त्रीय गायनाचे शिक्षण गुरुवर्य कै. विनायकराव पुराणिक (जळगाव) यांच्याकडे झाले. या अलंकार पदवीप्राप्त आहेत. डी. आर. हायस्कूल आणि डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल येथे ३५ वर्षे संगीत शिक्षिका म्हणून काम केले. नंदुरबार येथे कै. विनायकराव पुराणिक यांनी ‘‘छाया संगीत साधना विद्यालय’’ स्थापन केले. या विद्यालयातून सुनीता चव्हाण शास्त्रीय संगीताचे विशारद, बी. ए., एम. ए., अलंकारपर्यंत उत्कृष्ट शिक्षण देत आहेत. येथून विशारद झालेले विद्यार्थी संगीत क्षेत्रात कार्य करीत आहेत. सुगम संगीताचे देखील त्या शिक्षण देतात.
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मिरज, वाशी यांचे मान्यताप्राप्त सेंटर येथे आहे. शास्त्रीय संगीताच्या परीक्षेला विद्यालयाच्या विद्यार्थ्यांबरोबर जवळपास अशा छोट्या गावातूनही विद्यार्थी परीक्षेला येतात. सध्या ऑनलाईन गायन सेवाही सुरू आहे. आकाशवाणी, दूरदर्शनवर कार्यक्रम होतात. पुणे, मुंबई विभागात ‘एक सूर एक ताल’ या कार्यक्रमात एक हजार विद्यार्थ्यांचा गीत मंच घेऊन तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य केले. निवेदन, सूत्रसंचालनही उत्कृष्ट करतात. मुख्यमंत्र्यांचे मानपत्र वाचनही केले आहे तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. या पवित्र कार्यात गुरूबंधू राजेश पुराणिक यांचे सहकार्य आणि पती चंद्रशेखर चव्हाण यांची साथ मिळत आहे.