खरा इतिहास समाजासमोर यावा- अभिनेते राहुल सोलापुरकर
By Admin | Updated: July 3, 2017 17:11 IST2017-07-03T17:11:25+5:302017-07-03T17:11:25+5:30
आजच्या संगीतात शब्दांची किंमत कमी झाली

खरा इतिहास समाजासमोर यावा- अभिनेते राहुल सोलापुरकर
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.3 - महाराष्ट्राला खूप मोठा इतिहास आहे. मात्र दुदैव असे की तो आपल्या सोयीनुसार मांडला जातोयं. जनतेसमोर खरा इतिहास आला पाहिजे. तसेच ब्राrाण व ब्राम्हणेत्तर वादही अत्यंत चुकीचा आहे. या वादामुळे समाजात दरी पडत असल्याचे मत प्रसिध्द सिने अभिनेते राहुल सोलापुरकर यांनी येथे व्यक्त केले.
व.वा. वाचनालयाच्या 140 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’ कार्यक्रमासाठी ते शहरात आले असता, त्यांनी ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी त्यांनी हिंदी चित्रपटातील जुनी गाणी व आजच्या गाण्यांमध्ये झालेला बदल, देव आनंद, दिलीपकुमार, राज कपूर या सुपरस्टार्स यांचा सुवर्णमयी कालखंड, शंकर-जयकिशन, नौशाद, गुलजार व जावेद अख्तर या गीतकार-संगीतकार विषयीची माहिती व छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, पेशवा बाजीराव यांचे कतरुत्व तसेच इतिहासाविषयी सुरु असलेले वाद-प्रतिवाद या विषयांवर मनमोकळा संवाद साधला.
बौध्दीकदृष्टया समाज सक्षम झाला पाहिजे
सोलापुकर म्हणाले की, बौध्दीकदृष्ट्या समाज सक्षम करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. शिक्षणाने माणूस सुसंस्कृत झाला की जाती-पातीच्या सर्व भिंती गडून पडतात. मात्र आज तसे होताना दिसत नाही. पाठय़पुस्तकांमध्ये संत ज्ञानेश्वरांच्या पाठोपाठ रितेश देशमुख या अभिनेत्याचा धडा शिकविला जातो. त्यामुळे आजच्या पिढीला आपण काय शिकवित आहोत याबाबत विचार करण्याची गरज आहे.
जुन्या गाण्यांचे गारुड आजही कायम
आजच्या काळातील संगीतकार चांगले संगीत निर्माण करत आहेत. मात्र 70 च्या काळातील संगीतात ज्या प्रकारे शब्दांची किंमत होती ती किंमत आजच्या संगीताला राहिली नसल्याची खंत सोलापुरकर यांनी व्यक्त केली. हल्ली अनेक नवीन चित्रपटांमध्ये जुनी गाणी नव्याने ‘रिमीक्स’ करून ऐकविली जात आहे. यावरून जुन्या गाण्यांचे गारुड आजही कायम असल्याचे सिद्ध होते.