भुसावळात रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 01:41 PM2021-04-20T13:41:44+5:302021-04-20T13:42:05+5:30

रेल्वेस्थानकावर खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.

Action taken against food vendors at railway station in Bhusawal | भुसावळात रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई

भुसावळात रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई

googlenewsNext

भुसावळ :  कोरोना काळातही नियमांचे पालन न करणाऱ्या  खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर येथील रेल्वे स्थानकावर मंगळवारी कारवाई करण्यात आली. रेल्वेने अनधिकृत वेंडर्सवर कारवाई करीत तीन ते चार लाखांचे साहित्य जप्त केले आहे. या कारवाईमुळे अनधिकृत वेंडर्समध्ये खळबळ उडाली आहे.
कोरोनाची दुसरी लाट  चक्रीवादळासारखी घोंगावत असल्यामुळे रुग्ण संख्येतदेखील मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. महाराष्ट्रातसुद्धा कोरोनाचा उद्रेक वाढल्याने लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई तसेच इतर प्रमुख शहरात कामाला असलेले परप्रांतीय मजूर मोठ्या संख्येने आपल्या गावाकडे रवाना होत आहे.  रेल्वेने जाणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनानेदेखील सतर्क होऊन उपाययोजना सुरू केल्या आहेत. 
देशात कोरोनाचा वाढता उद्रेक लक्षात घेता रेल्वे प्रशासनदेखील प्रवाशांच्या वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवून आहेत. रेल्वे स्थानकावर जाताना प्रवाशांच्या कोरोना रिपोर्टची पाहणी करूनच त्यांना आत सोडले जात आहे. तसेच शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करण्यासाठी पथक नियुक्त करण्यात आले आहे. सध्या परप्रांतीय मजूर रेल्वे मोठ्या संख्येने आपापल्या गावाकडे परत जात आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकावर गाडी आली असता खाद्यपदार्थ विक्री स्टॉलवर या प्रवाशांचे एकच झुंबड उडत असते. अशावेळी सोशल डिस्टंन्सिंग ठेवणे आवश्यक आहे. मात्र काही खाद्यपदार्थ विक्रेते अतिशय जवळ उभे राहून गर्दी करीत असतात. त्यामुळे एकाच ठिकाणी प्रवाशांची गर्दी होत असते. त्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने नियमावली जाहीर केली असून, त्याचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा दिला होता. त्यानुसार मंगळवारी  रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक एक ते आठवर दिवसभरात धडक कारवाई करण्यात आली आहे. यावेळी अनधिकृतपणे तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करीत त्यांच्याजवळील साहित्य जप्त करण्यात आले आहे. 
रेल्वे सूत्रांच्या माहितीनुसार जवळपास तीन ते चार लाखांचे साहित्य प्रशासनाने जप्त केले आहे. या कारवाईमुळे अनधिकृत वेंडर्समध्ये खळबळ उडाली आहे. रेल्वे स्थानकावर नियमांचे सक्तीने पालन केले जात आहे. यात कुचराई करणाऱ्यांवर प्रशासन कारवाई करीत असल्याचे यातून दिसून आले. 
रेल्वे वाणिज्य विभागाचे प्रबंधक युवराज पाटील व आरपीएफ आयुक्त क्षितिज गुरुव यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नियुक्त करण्यात आले आहे. या पथकात वाणिज्य निरीक्षक शकील शेख, किरण ठाकूर, आरपीएफ निरीक्षक यादव यासह तिकीट तपासणी कर्मचारी यांचा सहभाग करण्यात आला आहे. जप्त केलेले साहित्य पार्सल कार्यालयात ठेवण्यात आले आहे.

Web Title: Action taken against food vendors at railway station in Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.