तक्रार दाखल करून न घेतल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:22 IST2021-09-09T04:22:39+5:302021-09-09T04:22:39+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कोणत्याही नागरिकाने तक्रार दिली असेल, तर पोलिसांनी ती विनाविलंब नोंदवून घेणे अपेक्षित आहे. तक्रार खोटी असेल, ...

तक्रार दाखल करून न घेतल्यास कारवाई
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कोणत्याही नागरिकाने तक्रार दिली असेल, तर पोलिसांनी ती विनाविलंब नोंदवून घेणे अपेक्षित आहे. तक्रार खोटी असेल, तर ती तपासात निकाली काढण्याचे अधिकार पोलिसांना आहेत. मात्र, तक्रारच दाखल करून न घेणे चुकीचे आहे. त्याशिवाय सीआरपीसी १५४ प्रमाणे हद्दीचा वाद न घालता शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल होणे अपेक्षित आहे, तसे झाले नाही, तर प्रभारी अधिकारी व ठाणे अंमलदाराविरुद्ध विभागीय कारवाई होऊ शकते.
कोट..
घटना कुठेही घडलेली असली तरी शून्य क्रमांकाने दाखल करून तो गुन्हा संबंधित पोलीस ठाण्याकडे वर्ग केला जातो. हद्दीच्या वादामुळे गुन्हा दाखल झाला नाही, असे प्रकार अलीकडच्या काळात जिल्ह्यात अजून तरी घडलेले नाहीत. तसा प्रकार घडला तर प्रभारी अधिकाऱ्यालाच जबाबदार धरून कारवाई केली जाईल.
-चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक
गुन्हा दाखल न करण्याचे हे आहे उदाहरण
जिल्हा रुग्णालयातील व्हेंटिलेटर व कॉन्सन्ट्रेटर गैरव्यवहार प्रकरणात दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करावा यासाठी तक्रारदार दिनेश भोळे मंगळवारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते. जाताना त्यांनी फिर्यादही नेलेली होती. मात्र, प्रभारी अधिकारी नसल्याचे सांगून दुय्यम अधिकारी व ठाणे अंमलदारांनी तक्रारच घेतली नाही. त्यामुळे भोळे यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश व्हावेत यासाठी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला.
यापूर्वी असे घडले होते हद्दीचे विषय
१) आंतरजातीय विवाह केलेल्या प्रेमीयुगुलाच्या प्रकरणातील पीडिता नशिराबादला वास्तव्याला असल्याने त्या तेथे तक्रार द्यायला गेल्या होत्या. मात्र, घटनास्थळ शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने तेथे हद्दीचा वाद निर्माण करून तक्रार घेण्यात आली नाही. दुसऱ्या दिवशी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
२) शिरसोली रस्त्यावरील देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयापासून शहरात येत असलेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला रिक्षा चालकाने डी मार्टजवळ उतरवून त्याला मारहाण केली आणि त्याच्याजवळील पाचशे रुपये हिसकावून पळ काढल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेनंतर विद्यार्थ्याने पोलिसांकडे धाव घेतली असता त्याला टोलवाटोलव करण्यात आली. या घटनेनंतर मोहित याने इच्छा देवी चौकीत जाऊन एका पोलिसाला सांगितले. त्या पोलिसाने एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचा सल्ला दिला. तेथे गेल्यावर हा तरुण दीड तास थांबला, घटनास्थळ रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याचे सांगून तेथे जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्याने पुन्हा रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठले. तेथेही दीड तास थांबवून ठेवत ठाणे अमलदाराने आज नको, उद्या ये, असे सांगून हाकलून लावले होते.