भाच्याच्या भेटीला येत असलेल्या मामाचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:15 IST2021-07-26T04:15:01+5:302021-07-26T04:15:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : भुसावळहून पिंप्राळ्यातील भाच्याच्या भेटीला व बँकेतील कामानिमित्त येत असलेल्या प्रकाश श्यामराव जोशी (४६, ...

भाच्याच्या भेटीला येत असलेल्या मामाचा अपघाती मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : भुसावळहून पिंप्राळ्यातील भाच्याच्या भेटीला व बँकेतील कामानिमित्त येत असलेल्या प्रकाश श्यामराव जोशी (४६, रा. कोळी मंगल कार्यालयाजवळ, भुसावळ) यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची मुलगी आदिती गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी ८.४५ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील दूरदर्शन टॉवरजवळ घडली. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळातील कोळी मंगलकार्यालयाजवळ प्रकाश जोशी हे पत्नी व तीन मुलींसह वास्तव्यास होते. ते जळगावातील जळगाव जनता सहकारी बँकेतील मानव संसाधन विभागात व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. रविवारी सुटी असल्यामुळे जोशी कुटुंबीयांनी जळगावातील पिंप्राळ्यात वास्तव्यास असलेल्या भाच्याकडे येण्याचे नियोजन केले होते. यादरम्यान त्यांना बँकेतही काम होते. त्यानुसार रविवारी सकाळी प्रकाश जोशी व त्यांची मुलगी आदिती हे दोघे दुचाकीने (एमएच-१९ डीएम-९०७१) जळगावकडे निघाले. दरम्यान, दूरदर्शन केंद्राजवळून जात असताना जोशी यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगी आदिती हिच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली.
जखमी मुलीला खाजगी रुग्णालयात हलविले
अपघातानंतर घटनास्थळावरून नागरिकांनी १०८ रुग्णवाहिकेला संपर्क साधला. त्यानंतर मयत प्रकाश जोशी व त्यांची जखमी कन्या यांना लागलीच जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. आदितीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तिला पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यावेळी जिल्हा रुग्णालयात कुटुंबीयांसह बँकेतील कर्मचाऱ्यांची गर्दी झाली होती.
वाहन चालकाविरुद्ध गुन्हा
याप्रकरणी भाचा अतुल श्रीकांत पाठक यांच्या फिर्यादीवरून जोशी यांच्या वाहनाला धडक देणाऱ्या अज्ञात वाहन चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अमोल मोरे व पोलीस कर्मचारी नितीन पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. प्रकाश जोशी यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली असा परिवार आहे.