जागृत नागरिकाच्या सतर्कतेने सापडली अपहरण झालेली बालके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:14 IST2021-06-02T04:14:00+5:302021-06-02T04:14:00+5:30

जळगाव/ अमळनेर : शनीपेठेतील गोपाळपुरा येथून अपहरण झालेला मुलगा व मुलगी सुरेश पापाजी दाभोळे (रा.मारवड, ता.अमळनेर) या जागरूक ...

The abducted children were found on the alert of the vigilante citizen | जागृत नागरिकाच्या सतर्कतेने सापडली अपहरण झालेली बालके

जागृत नागरिकाच्या सतर्कतेने सापडली अपहरण झालेली बालके

जळगाव/ अमळनेर : शनीपेठेतील गोपाळपुरा येथून अपहरण झालेला मुलगा व मुलगी सुरेश पापाजी दाभोळे (रा.मारवड, ता.अमळनेर) या जागरूक नागरिकामुळे सापडली असून ती सुखरुप आहेत. मंगळवारी रात्री त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले. चार दिवसापासून बालकांचा शोध सुरु होता. बालकांना सुखरुप पाहून पालक व पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान, अपहरणकर्ता सुनील प्रताप बारेला (रा.चिरमल्या, ता. वरला जि बडवाणी) याला अटक करण्यात आली आहे.

बारेला याने २७ रोजी चिकनचे दुकान कुठे आहे, मला दाखवा असे सांगून गोपाळपुरा भागातून शुभांगी राजू चव्हाण (वय १०) व मयूर रवींद्र बुनकर (वय ७) या दोघांना पळवून नेले होते. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. याप्रकरणी शनीपेठ पोलिसात अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. शनी पेठ पोलीस व स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीसदेखील शोध घेत होते.

असे फुटले बींग

सुरेश पापाजी दाभोळे हे मंगळवारी मारवड रस्त्यावर मारूतीच्या दर्शनाला जात असताना त्यांना लहान मुले व एक इसम पायी जाताना दिसले. त्यांना त्यांची दया आल्याने मी तुम्हाला कुठे सोडू, कुठे जायचे आहे असे विचारले असता सुनील बारेला याने मी काम शोधत आहे असे सांगितले. त्यावेळी सुरेश दाभोळे यांनी त्याला एका तबेल्यात कामासाठी नेले. दुपारी सुनील बारेला थोडा बाजूला जाताच ती लहान मुले रडू लागली आणि हे आमचे वडील नाहीत याने आम्हाला जळगावहून पळवून आणल्याचे सांगितले. दाभोळे यांनी क्षणाचा विलंब न करता तात्काळ हेडकॉन्स्टेबल जनार्दन पाटील यांच्याशी संपर्क साधून त्या तिघांना पोलीस स्टेशनला आणले. दरम्यान, बारेला याला पोलिसांनी ताब्यात घेत शनीपेठ पोलिसांना कळविले. शनीपेठ पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अमोल कवडे, गणेश गव्हाळे, अनिल कांबळे ,विजय निकम, मुकूंद गंगावणे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे संजय हिवरकर, राजेश मेंढे, रवी नरवाडे, संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, परेश महाजन, अशोक पाटील यांनी अमळनेर गाठून सुनील बारेला याला ताब्यात घेतले. दोन्ही मुलांना रात्री त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. सुरेश दाभोळे यांच्या सतर्कतेने अपहरण करणारा आरोपी तर सापडलाच परंतु, मुले देखील सुखरुप मिळाले.

Web Title: The abducted children were found on the alert of the vigilante citizen