अबब.. विजेची जोडणी नसतानाही शेतकऱ्याला दीड लाखाचे वीज बिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:21 IST2021-09-14T04:21:02+5:302021-09-14T04:21:02+5:30
जळगाव : नियमानुसार वीज जोडणीसाठी लागणारे सर्व शुल्क भरूनही महावितरणने सात वर्षांपासून जोडणी न करता, रायपूर येथील एका ...

अबब.. विजेची जोडणी नसतानाही शेतकऱ्याला दीड लाखाचे वीज बिल
जळगाव : नियमानुसार वीज जोडणीसाठी लागणारे सर्व शुल्क भरूनही महावितरणने सात वर्षांपासून जोडणी न करता, रायपूर येथील एका शेतकऱ्याला चक्क दीड लाख रुपयाचे वीज बिल पाठविले आहे. हे वीज बिल पाहून संबंधित शेतकरी बांधवाला चांगलाच धक्का बसला असून, या प्रकारामुळे महावितरण कंपनीचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. तसेच या बिलानंतर संबंधित शेतकऱ्याने महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही बिलाबाबत न्याय मिळत नसल्यामुळे, हे बिल कसे भरावे, असा प्रश्न या शेतकऱ्यासमोर पडला आहे. दिलीप कडू धनगर (रा. रायपूर) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
तालुक्यातील रायपूर येथील रहिवासी दिलीप कडू धनगर यांची रायपूर गावाला लागून गट नंबर १०३-१ मध्ये स्वत: च्या मालकीची शेती आहे. या शेतात त्यांनी २०१४ साली बोअरवेल केली होती. बोअरवेलचे पाणी उपसण्यासाठी दिलीप धनगर यांनी महावितरणच्या चिंचोली येथील कार्यालयाकडे वीज जोडणी मिळण्याबाबत लेखी अर्ज केला होता. अर्जानंतर वीज पुरवठा मिळण्यासाठी धनगर यांनी २५ मार्च २०१४ रोजी ७ हजार रुपये इतकी डिमांड रक्कमही महावितरणकडे भरली होती. मात्र, सात वर्षे उलटल्यानंतरही महावितरणने धनगर यांना वीज जोडणी दिलेली नाही. विजेची जोडणी मिळण्याबाबत दिलीप धनगर या शेतकऱ्याने अनेकवेळा चिंचोली कार्यालयात चकरा मारल्या. मात्र, अधिकाऱ्यांकडून वेगवेगळी कारणे सांगण्यात येत असल्यामुळे धनगर यांनी वीज जोडणी मिळणार नसल्याचे गृहीत धरून महावितरणच्या कार्यालयात जाणेही बंद केले आहे.
इन्फो :
...अन् जोडणी नसतानाही आले दीड लाखाचे बिल
दिलीप धनगर यांनी गेल्या सात वर्षाेत अनेकदा महावितरणच्या कार्यालयात चकरा मारूनही, वीज जोडणी मिळाली नाही. मात्र, गेल्या आठवड्यात धनगर यांना थेट १ लाख ५४ हजार ९७० रुपयांचे वीज बिल आले आहे. शेतात वीज जोडणी नाही, मीटर नाही, त्यामुळे हे बिल कसे आले, याबाबत दिलीप धनगर यांनी अनेकवेळा महावितरणच्या रायपूरजवळील चिंचोली कार्यालयात तक्रारी केल्या. मात्र, अद्यापही धनगर यांचे देण्यात आलेल्या बिलाचे कारण सांगण्यात आलेले नाही. दरम्यान, या प्रकाराबाबत चिंचोली येथील महावितरणचे सहायक अभियंता एस. आर. राऊत यांच्यांशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
इन्फो :
माझ्या शेतात वीज जोडणीसाठी २५ मार्च २०१४ मध्ये डिमांड नोट भरूनही महावितरण प्रशासनाने वीज जोडणी दिलेली नाही. वरून नंबर आल्यावर, वीज जोडणी होणार असल्याचे सात वर्षांपासून सांगण्यात येत आहे. मात्र, सात वर्षांत विजेची जोडणी नसताना दीड लाखाचे वीजबिल आल्यामुळे मला धक्काच बसला आहे. या बिलाबाबत चिंचोली कार्यालयात अनेकवेळा जाऊनही न्याय मिळालेला नाही.
-दिलीप धनगर, शेतकरी, रायपूर