आरुषीचे प्रेत प्रांत कार्यालयात आणले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:22 IST2021-09-08T04:22:41+5:302021-09-08T04:22:41+5:30
सात्री गाव निम्न तापी प्रकल्पात बुडीत क्षेत्रात असल्याने त्याचे पुनर्वसन सुरू आहे. त्यामुळे शासन या गावाला कोणत्याही सुविधा देत ...

आरुषीचे प्रेत प्रांत कार्यालयात आणले
सात्री गाव निम्न तापी प्रकल्पात बुडीत क्षेत्रात असल्याने त्याचे पुनर्वसन सुरू आहे. त्यामुळे शासन या गावाला कोणत्याही सुविधा देत नाही आणि पुनर्वसन प्रक्रिया कासवाच्या गतीने सुरू आहे.
तीन वेळा प्रस्ताव व्यपगत झाले. उपमुख्यमंत्री कार्यालयात झालेल्या बैठकीनंतरदेखील पाटबंधारे महामंडळाने बैठकीतील निर्णयाची अंमलबाजवणी न केल्याने पुनर्वसन रखडले आहे. सात्री येथून बाहेर जाण्यासाठी कोणताच रस्ता नाही. निंभोरा कलाली गावाकडून जायचे असेल तर चार किमी पायी दऱ्या-खोऱ्यातून शेतातून जावे लागते.
पावसाळ्यात तेथे पाय फसतात आणि बोरी नदीवर पूल नसल्याने पुरातून जाता येत नाही. वर्षानुवर्षापासून ही समस्या भेडसावत असूनसुद्धा प्रशासन लक्ष देत नाही. म्हणून संतप्त गावकरी उपविभागीय कार्यालयावर धडकले होते. मुलीच्या नातेवाइकांनी आक्रोश केला होता.
पुनर्वसन व पुनर्विलोकन समितीचे अशासकीय सदस्य महेंद्र बोरसे यांनी प्रशासनाने या मुलीचे प्रेत सात्री गावापर्यंत नेऊन अंत्यसंस्कार करून दाखवावे, असे आव्हानच दिले होते. उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ यांनी वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू करून आपत्ती व्यवस्थापनाची बोट मागवून शव गावात नेण्यासाठी प्रयत्न केले. मात्र मंत्रालयातून परवानगी आणि किचकट प्रक्रियेमुळे बोट वेळेवर उपलब्ध होऊ शकले नाही.
अखेरीस प्रशासनाने महेंद्र बोरसे यांनाच विनंती करत ज्या लोकांनी आरुषीचे प्रेत आणले, त्यांनाच ते घेऊन जाण्यासाठी विनंती केली. या वेळी निम्न तापी प्रकल्पाचे कार्यकारी अधिकारी मुकुंद चौधरी, अभियंता डी.सी. पाटील हेदेखील हजर होते. सीमा अहिरे यांनी लवकरच पुनर्वसनासंदर्भात बैठक बोलावून योग्य तो निर्णय घेतला जाईल आणि निंभोऱ्याकडून या गावांसाठी विशेष रस्ता तयार करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलक शांत झाले. प्रांत, तहसीलदार, तलाठी पथक यांनी डांगरी गावापर्यंत प्रेत नेले. तेथून त्याच गावकऱ्यांनी नदीतून प्रेत परत सात्री येथे नेऊन अंत्यसंस्कार केले.
दरम्यान, गावात ७० लोक आजारी होते. गावातील आशा स्वयंसेवक आजारी पडल्याने कोणालाच औषधी मिळू शकली नव्हती. आजारी असतानाही आसाराम युवराज भिल, आनंदा पुंजू भिल, सोपान गुलाब भिल, सुखदेव रावण भिल, अजय किशोर भिल या तरुणांनी नदीतून आरुषीला डांगरी येथे आणून तेथून ग्रामीण रुग्णालयात आणले होते. या वेळी केस पेपर काढूनही आजारी लोकांना कर्मचारी वेळेवर उपचार करत नसल्याने त्यांचा संताप अधिकच वाढला होता.
उपविभागीय कार्यालयात डॉक्टरांबद्दल नाराजी व्यक्त केल्याने डॉ. प्रकाश ताळे, डॉ. आशिष पाटील, जितेंद्र जाधव, परिचारिका वळवी यांनी आंदोलकांना उपविभागीय कार्यालयात येऊन आजारी आंदोलकांवर उपचार केले. त्यादरम्यान डॉ. गिरीश गोसावी यांनी आपले पथक निंभोरामार्गे चार किमी गाऱ्यातून पायी चालवून सात्री येथे पाठवून उपचार सुरू केले होते.
वर्षानुवर्षाची व्यथा मांडताना बोरसे यांनी सांगितले की, नदीतून प्रवास करताना टोकदार खडी, काच, काटे पायात टोचल्याने २२ लोकांना गँगरीन होऊन ते अपंग झाले आहेत. तरी प्रशासनाला जाग आली नाही.
घटना अतिशय दुर्दैवी आहे, यापुढे असे होणार नाही याची काळजी प्रशासनाला घेण्याचे आदेश देतो व पुनर्वसन तत्काळ करून गावचे स्थलांतर केले जाईल.
- अनिल पाटील, आमदार, अमळनेर