दरड कोसळल्यामुळे मुंबईकडून येणाऱ्या ९ एक्सप्रेस रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:12 IST2021-07-23T04:12:03+5:302021-07-23T04:12:03+5:30
जळगाव : कसारा घाटात बुधवारी मध्यरात्री पावसामुळे दरड कोसळल्यामुळे गुरूवारी पहाटे पासूनच मुंबईकडून जळगावला येणाऱ्या व जळगावहून मुंबईकडे ...

दरड कोसळल्यामुळे मुंबईकडून येणाऱ्या ९ एक्सप्रेस रद्द
जळगाव : कसारा घाटात बुधवारी मध्यरात्री पावसामुळे दरड कोसळल्यामुळे गुरूवारी पहाटे पासूनच मुंबईकडून जळगावला येणाऱ्या व जळगावहून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्यांचा खोळंबा झाला. यामुळे गुरूवारी मुंबईकडून जळगावकडे येणाऱ्या ९ सुपरफास्ट गाड्या रद्द करण्यात आल्या. जळगावहून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या सुरत-वसई मार्गे मुंबईकडे रवाना करण्यात आल्या. दरम्यान, बुधवारी मध्यरात्री जळगावहून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्याही दरड कोसळल्यामुळे नाशिक, मनमाड व भुसावळ पर्यंत धावल्या असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
बुधवारी मध्यरात्री तर पावसामुळे कसारा घाटात दरड कोसळल्याने हा मार्ग पूर्णत बंद झाला आहे. या दुर्घटनेमुळे रेल्वे प्रशासनातर्फे मुंबईकडून निघालेल्या गाड्या पुन्हा सीएसटी स्टेशनकडे माघारी फिरविण्यात आल्या. तर जळगावहून मुंबईकडे रात्री निघालेल्या अनेक गाड्या जागेवरच थांबविण्यात आल्या. रेल्वे प्रशासनाने मुंबईकडून येणाऱ्या काशी एक्सप्रेस, हावडा एक्सप्रेस या महत्वाच्या गाड्यासह सुमारे १२ गाड्या रद्द केल्या आहेत.
इन्फो :
मुंबईहून रद्द करण्यात आलेल्या गाड्या
- काशी एक्सप्रेस
- हावडा एक्सप्रेस
- मुंबई- शालिमार एक्सप्रेस
-मुंबई-बनारस एक्सप्रेस
-छपरा एक्सप्रेस
-पवन एक्सप्रेस
- अमरावती एक्सप्रेस
-गोरखपुर सुपरफास्ट एक्सप्रेस
-सेवाग्राम एक्सप्रेस
इन्फो :
मुंबईकडून सुरतमार्गे येणाऱ्या गाड्या
-महानगरी एक्सप्रेस
-बनारस एक्सप्रेस
- अमृतसर एक्सप्रेस
-गोरखपुर सुपरफास्ट एक्सप्रेस
इ्न्फो :
काशी एक्सप्रेस भुसावळ पासून रद्द
रेल्वे प्रशासनातर्फे गुरूवारी सकाळपासून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचा खोळंबा झाल्यामुळे काही गाड्या सुरत मार्गे रवाना करण्यात आल्या. तर काशी एक्सप्रेस मुंबईला रवाना न करता, भुसावळपासूनच रद्द करण्यात आला आणि भुसावळहून पुन्हा गोरखपूर कडे रवाना करण्यात आला. या गाडीतील मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना दुसऱ्या गाडीने सुरतमार्गे मुंबईला जावे लागले.
इन्फो :रेल्वेने अनेक प्रवाशांना सोडले बसने मुंबईला
जळगावहून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्यांचा खोळंबा झाल्यामुळे, राजधानी एक्सप्रेस व सेवाग्राम एक्सप्रेस जळगाव पासून रद्द करण्यात येणार होत्या. त्यामुळे प्रवाशांनी काहीही करून मुंबईला सोडून देण्याची मागणी लावून धरली होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनातर्फे सीनिअर डीसीएम युवराज पाटील यांनी एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांच्यांशी संपर्क साधून, बसेसची उपलब्ध करून दिल्या. मात्र, अचानक या प्रवाशांनी बसेसला विलंब होणार असल्यामुळे, सुरत मार्गे मुंबईला जाणाऱ्या गाड्यांमधुन जाणे पसंत केले. मात्र, सेवाग्राम एक्सप्रेसच्या प्रवाशांना नाशिकहून बसने मुंबईला रवाना करण्यात आले असल्याचे युवराज पाटील यांनी सांगितले. तसेच ही दरड कोसळल्यामुळे सोमवारी भुसावळ विभागातील एकूण २६ गाड्या रद्द करण्यात आल्या असून, २१ गाड्या या अर्ध्या रस्त्यातूनच रद्द करण्यात आल्या. तसेच २४ गाड्या विविध मार्गे मुंबईकडे वळविण्यात आल्या. अनेक प्रवाशांनी तिकीटे रद्द केल्यामुळे, दिवसभरात विविध स्टेशवरून दीड लाख रूपयांचा परतावा प्रवाशांना दिला असल्याचे युवराज पाटील यांनी सांगितले.