भाजपचे ८ ते १० नगरसेवक आमच्या संपर्कात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:13 IST2021-07-01T04:13:25+5:302021-07-01T04:13:25+5:30
मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन : महापौरांसह घेतली एकनाथ खडसेंची भेट : अर्धा तास बंदव्दार चर्चा लोकमत न्यूज नेटवर्क ...

भाजपचे ८ ते १० नगरसेवक आमच्या संपर्कात
मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन : महापौरांसह घेतली एकनाथ खडसेंची भेट : अर्धा तास बंदव्दार चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : भाजपमधून फुटून आलेला कोणताही नगरसेवक परत भाजपमध्ये जाणार नसून, अजून भाजपचे ८ ते १० नगरसेवक आमच्या संपर्कात असून, लवकरच त्यांचा प्रवेश होईल, असा दावा मनपातील विरोधी पक्षनेते सेनेचे सुनील महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
महापौर जयश्री महाजन व विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी बुधवारी माजी मंत्री एकनाथ खडसे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी महापौर व विरोधी पक्षनेत्यांनी खडसेंसोबत अर्धा तास बंदव्दार चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील व माजी उपमहापौर सुनील खडके हेदेखील उपस्थित होते. दरम्यान, या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले असून, भेटीनंतर ही भेट हुडको कर्जफेडीबाबत असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले. मात्र, या भेटीमुळे महापालिकेत पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर महापौर जयश्री महाजन व विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी एकनाथ खडसे यांची पहिल्यांदाच भेट घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपमधून फुटून आलेले काही नगरसेवक पुन्हा भाजपमध्ये जाण्याची तयारी करत असल्याची चर्चा होती. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची ठरत आहे. या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत खडसे यांनी ही भेट मनपावर हुडकोचे कर्ज फेडल्यामुळे राज्य शासनाचे कर्ज असून, ते कर्ज फेडण्याबाबत महापौरांनी विनंती केली असून, याबाबत राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करण्याबाबतचे निवेदन दिले होते. याबाबतच या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती खडसेंनी दिली. तसेच मनपा कर्जमुक्तीचा माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केलेला दावा चुकीचा असल्याचेही खडसे यांनी यावेळी सांगितले.