मराठा समाज मोर्चात जळगाव जिल्ह्यातील 70 हजार जणांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 17:22 IST2017-08-09T17:14:19+5:302017-08-09T17:22:35+5:30
नियोजन बैठकीतही जळगावचा सहभाग : आरक्षणाबाबत अपेक्षा पूर्ती न झाल्याने निराशा

मराठा समाज मोर्चात जळगाव जिल्ह्यातील 70 हजार जणांचा सहभाग
जळगाव : आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी बुधवारी मुंबई येथे काढण्यात आलेल्या मराठा समाजाच्या ऐतिहासिक मूकमोर्चात जळगाव जिल्ह्यातील 60 ते 70 हजार समाजबांधव सहभागी झाले होते. विशेष म्हणजे मोर्चाच्या पूर्वसंध्येला मुबंई येथे झालेल्या नियोजन बैठकीतही जळगावच्या शिष्टमंडळाला निमंत्रित करण्यात आले होते.
तब्बल 57 मोर्चे काढून सुद्धा मराठा समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने 9 ऑगस्ट क्रांती दिनी मुंबई येथे मराठा समाजाचा मूक मोर्चा काढण्यात आला. यामध्ये सहभागी होण्यासाठी जळगाव जिल्ह्यातून मराठा समाज बांधव रेल्वे, बसेस्, खाजगी वाहने याद्वारे मुंबईत धडकले. यामध्ये प्रा. डी.डी. बच्छाव, डॉ. राजेश पाटील, विनोद देशमुख, किरण बच्छाव, माजी उप महापौर किशोर पाटील, महेश पाटील, दीपक सूर्यवंशी, मिलिंद सोनवणे, रवींद्र पाटील, संजय पवार, अॅड. विजय पाटील, राजेश पाटील, अनिल भाईदास पाटील, प्रशांत पवार, सचिन सोमवंशी, महेश पाटील, पराग घोरपडे, अरविंद निकम, रमेश पाटील यांच्यासह जिल्हाभरातील तब्बल 60 ते 70 हजार समाजबांधव या मोर्चात सहभागी झाले. यामध्ये जळगाव शहरातील 15 ते 16 हजार समाजबांधवांचा सहभाग होता.
सकाळी 11 वाजता भायखळा येथून मोर्चाला सुरुवात झाली, पुढे हा मोर्चा अण्णासाहेब पाटील पूल, खडापारसी, इस्माईल मचर्ंट चौक, जे. जे. उड्डाणपूलमार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ओलांडून आझाद मैदानात विसर्जित झाला. यामध्ये सुरुवातीपासून अखेर्पयत जळगावकर सक्रीय सहभागी झाले.
जळगावच्या बॅनरखाली हजारोंचा सहभाग
‘मराठा क्रांती मोर्चा, जळगाव जिल्हा’ असा उल्लेख असलेल्या एका भव्य बॅनरखाली जळगाव येथील समाजबांधव या मोर्चात सहभागी झाले होते.
आरक्षणाच्या मुद्यावरून नाराजी
समाजाच्या इतर मागण्या मान्य करण्यात आल्या तरी आरक्षणाबाबत निर्णय न झाल्याने अपेक्षाभंग झाल्या असल्याच्या प्रतिक्रिया जळगावकरांनी व्यक्त केल्या.
नियोजनाच्या बैठकीत जळगावकरांचा समावेश
मोर्चाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी दादर येथील शिवाजी मंदिरात मराठा मोर्चासंदर्भात नियोजन बैठक झाली. यामध्ये जळगावचे प्रा. डी.डी. बच्छाव, डॉ. राजेश पाटील, विनोद देशमुख, सचिन सोमवंशी, दीपक सूर्यवंशी आदींचा समावेश होता.