लोकमत न्यूज नेटवर्क
भडगाव : तालुक्यातील मराठी माध्यमाच्या शाळांसाठी शासनाकडून समग्र शिक्षा अभियानांतर्गत ६७ हजार ६०३ मोफत पाठ्यपुस्तके प्राप्त झाली आहेत. लवकरच तालुक्यातील केंद्रस्तरावर त्याचे वितरण होईल तर यानंतर शाळा स्तरावरून विद्यार्थ्यांना ही पाठ्यपुस्तके वितरित केली जाणार आहेत, अशी माहिती भडगाव पंचायत समिती शिक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली.
शहरासह तालुक्यातील मराठी माध्यमाच्या शाळांसाठी शासनाकडून पुस्तके प्राप्त झाली आहेत. ती चाळीसगाव रोडवरील ग्रीनपार्क उर्दू शाळेत ठेवण्यात आली आहेत. गटशिक्षण अधिकारी सचिन परदेशी यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून या पुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. २९ जुलै रोजी दुसरी ते आठवीतील मराठी माध्यमाची २८ विषयांची पुस्तके प्राप्त झाली आहेत. त्यात चौथी बालभारती, पाचवी हिंदी हे विषय बाकी आहेत, तर सहावीचा विज्ञान हा एकच विषय प्राप्त आहे. सातवीचे पूर्ण विषय प्राप्त झाले आहेत.
आठवी वर्गाचे हिंदी, विज्ञान व भूगोल हे विषय येणे बाकी आहेत. उर्दू व सेमी इंग्रजी या विषयांसोबतच ज्या वर्गांचे इतर विषय बाकी आहेत ते सर्व येत्या काही दिवसांत प्राप्त होतील.
सर्व वर्गांची विषयनिहाय व माध्यमनिहाय पुस्तके प्राप्त झाल्यानंतर त्याचे वितरण करण्यात येणार आहे. सर्वप्रथम केंद्रस्तरावर या पुस्तकांचे वितरण झाल्यानंतर शाळांचे मुख्याध्यापक किंवा प्रतिनिधींना पुस्तकांचे वितरण होऊन यानंतर शाळा स्तरावरून पालकांना ही पुस्तके दिली जाणार आहेत.
प्राप्त झालेली पाठ्यपुस्तके गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली समावेशित शिक्षणतज्ज्ञ निंबा परदेशी, सुभाष माळी, विषयतज्ज्ञ मनोहर माळी, डाटा एट्री ऑपरेटर किशोर पुजारी, विशेष शिक्षक किशोर पाटील, जितेंद्र माने व मिलिंद सोनवणे यांनी उतरविण्यासाठी परिश्रम घेतले.