मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज ६४ हजार; मंजुरी ५३ हजार विद्यार्थ्यांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:19 IST2021-09-23T04:19:04+5:302021-09-23T04:19:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : केंद्र शासनाच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा व इतर शैक्षणिक योजनेंतर्गत अनुसूचित जाती, विमुक्त ...

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज ६४ हजार; मंजुरी ५३ हजार विद्यार्थ्यांना
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : केंद्र शासनाच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा व इतर शैक्षणिक योजनेंतर्गत अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी आता ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, आतापर्यंत ६४ हजार ७८३ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यांपैकी ५२ हजार ९१३ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही मंजूर झाली असल्याची माहिती समाजकल्याण कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी), विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्ग प्रवर्ग, इत्यादी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. त्या अनुषंगाने शिष्यवृत्ती योजनेंतर्गत २०२०-२१ या वर्षातील शिष्यवृत्तीसाठी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने समाजकल्याण विभागाच्या साहाय्यक आयुक्त कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक आहे. यासाठी विभागाद्वारे महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यातच आता विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आली आहे.
- सन २०२०-२१ या वर्षात ३३८ महाविद्यालयांतील आतापर्यंत ६४ हजार ७८३ विद्यार्थ्यांनी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज केले आहेत. त्यांपैकी ५४ हजार २४२ अर्जांना महाविद्यालयाकडून मान्यता देऊन साहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या लॉगिनला पाठविण्यात आले आहे. त्यातील ५३ हजार २८२ विद्यार्थ्यांचे अर्ज परिपूर्ण असून, ते साहाय्यक आयुक्तांनी मंजुरी देऊन शासनाकडे पाठविले आहे. त्यातील ५२ हजार ९१३ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. तसेच एकूण अर्जांमधून २०१ अर्ज रिजेक्ट करण्यात आलेले आहेत. दरम्यान, आता महाविद्यालयांकडे १ हजार ९९२ अर्ज प्रलंबित आहेत.
- एकूण ६४ हजार ७८३ अर्जांपैकी १० हजार १३९ अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यातील ८ हजार ३६७ अर्जांना महाविद्यालयांनी मान्यता दिली असून, ४०८ अर्ज त्यांच्या लॉगिनला प्रलंबित आहेत; तर ८ हजार १९६ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे़ तसेच इतर मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी), विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्ग प्रवर्गातील ५४ हजार ६४४ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे. त्यातील ४५ हजार ८७५ अर्जांना महाविद्यालयांनी मान्यता दिली आहे; तर १ हजार ५८४ अर्ज महाविद्यालयस्तरावर अडकून आहे. तसेच ४४ हजार ९९६ अर्जांना साहाय्यक आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. ५ हजार १६३ अर्ज रद्द करण्यात आले आहेत; तर १५९ अर्ज रिजेक्ट करण्यात आले आहेत़. तसेच ४४ हजार ७१७ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे.
- विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची मुदत : ३० सप्टेंबर
- जिल्ह्यातील महाविद्यालये : ३३८
- अनुसूचित जाती प्रवर्ग (एकूण अर्ज) : १०,१३९
- इतर मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी), विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्ग प्रवर्ग (एकूण अर्ज) - ५४,६४४
- आतापर्यंत एकूण अर्ज : ६४,७८३