जिल्ह्यात ६०० घरांची पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:22 IST2021-09-09T04:22:25+5:302021-09-09T04:22:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस होत आहे. त्यात सोमवारी आणि मंगळवारी काही ठिकाणी ...

जिल्ह्यात ६०० घरांची पडझड
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस होत आहे. त्यात सोमवारी आणि मंगळवारी काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यात जिल्हाभरात २ ते ८ सप्टेंबर या कालावधीत ६०७ कच्च्या घरांची पडझड झाली आहे, तर आठ घरे पूर्ण कोसळली आहेत. त्याशिवाय २७ झोपड्या, आणि १३ दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीत सातजण जखमी झाले असून, ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ३६ जनावरांचादेखील बळी या पावसाने घेतला आहे. यात सर्वाधिक नुकसान हे जामनेर तालुक्यात झाले आहे.
जिल्ह्यात सोमवारी आणि मंगळवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार मंगळवारी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यात जामनेर तालुक्यात तोंडापूर बंधाऱ्यात एकजण वाहून गेला. तसेच त्यात तालुक्यात १५२ घरांचे नुकसान झाले आहेत, तर २३ झोपडी, ९ गोठे आणि पहूर व इतर गावांच्या बाजारपेठेतील १३ दुकानांचे नुकसान झाले आहे.
चाळीसगाव तालुक्यातदेखील २६ जनावरे या पावसामुळे दगावली, तर एकट्या चाळीसगाव तालुक्यात २३३ घरांची पडझड झाली आहे.
भडगाव तालुक्यात अतिवृष्टी
जिल्हा प्रशासनाकडे असलेल्या नोंदीनुसार भडगाव तालुक्यात ८ सप्टेंबरला ७१.१ मिली एवढा पाऊस झाला आहे, तर अमळनेरलादेखील ६४ मिली पावसाची नोंद करण्यात आली. जळगावमध्ये ४२.९ मिली पाऊस झाला. जामनेरला ६०.३ मिली पावसाची नोंद करण्यात आली आहे.
तालुका आजचे पर्जन्यमान आतापर्यंतचा पाऊस टक्केवारी
जळगाव ४२.९ ५४५.१ ९१.६
भुसावळ २३.४ ५०१.० ९५.६
यावल ४४.० ५२३.८ ९३.८
रावेर २९.१ ५८२.३ १०६.३
मुक्ताईनगर ३१.१ ५०६.३ १०४.३
अमळनेर ६४.० ४२८.८ ८४.९
चोपडा ४३.५ ३९९.७ ६९.३
एरंडोल ४५.८ ५९१.३ १११.८
पारोळा ४२.८ ६६९.२ १२६.२
चाळीसगाव ४६.७ ८३१.७ १६२.७
जामनेर ६०.३ ६६०.८ १११.१
पाचोरा ५३.८ ६००.१ ११०.०
भडगाव ७१.१ ५६८.१ १०४.७
धरणगाव ५२.७ ५०७.६ ८९.१
बोदवड ३५.४ ५५०.० ९८.७