ईंडीकॅश एटीएममधून ५०० च्या ठिकाणी मिळाले ५०००
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:20 IST2021-09-22T04:20:40+5:302021-09-22T04:20:40+5:30
चिनावल, ता. रावेर : कधी कुणी स्वप्नातही विचार केला नसेल असा आश्चर्यकारक अनुभव मंगळवारी चिनावलकरांनी एटीएममधून पैसे काढताना अनुभवला. ...

ईंडीकॅश एटीएममधून ५०० च्या ठिकाणी मिळाले ५०००
चिनावल, ता. रावेर : कधी कुणी स्वप्नातही विचार केला नसेल असा आश्चर्यकारक अनुभव मंगळवारी चिनावलकरांनी एटीएममधून पैसे काढताना अनुभवला. चक्क एटीएममधून टाकलेल्या रकमेच्या पाचपट पैसे निघत असल्याने येथील एसटी स्टँड परिसरातील ईंडीकॅशच्या एटीएमवर सायंकाळी सहा ते रात्री साडेआठपर्यंत तोबा गर्दी उसळली. पोलीस आल्यानंतर गर्दी निवळली.
येथील एटीएममधून पैसे काढणाऱ्यांनी जणू लाॅटरी लागल्यागत स्थिती अनुभवली. या प्रकाराची वाच्यता गावात होताच सर्वस्तरीय एटीएमधारकांनी या एटीएमवर गर्दी केली. एटीएममध्ये ५०० रुपये व त्याच्या पटीत रक्कम टाकल्यास चक्क पाचपट रक्कम निघत असल्याने अवघ्या अडीच तासात जवळजवळ सहा लाख रुपये येथून विड्राॅल झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. रात्री नऊ वाजेच्या सुमारास ईंडीकॅश कंपनीच्या लोडिंग कर्मचाऱ्याला याबाबतची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ सावदा पोलीस स्टेशनला कळवून एटीएममध्ये असलेल्या गर्दीवर नियंत्रण मिळविले व एटीएम लाॅक केले. तोपर्यंत बरीच रक्कम एटीएममधून काढली गेली होती.
याबाबत अद्याप सावदा पोलीस स्टेशनला नोंद झाली नसली तरी एटीएम सुरक्षेसाठी हे. काॅ. विनोद पाटील, रिजवान पिंजारी, ईशान तडवी, सुरेश अडाएगे, होमगार्ड प्रकाश भालेराव येथे तळ ठोकून आहेत.
याबाबत एटीएमच्या लोडिंग कर्मचाऱ्याला विचारणा केली असता, पैसे भरताना नोटांची ब्लाॅक सेटिंग चुकीची झाली असावी अथवा मशीन सेटिंग बिघाड झाल्याचा अंदाज व्यक्त केला. या प्रकारामुळे मात्र चिनावलकरांना मात्र लाॅटरी लागल्यागत अनुभव आला. चिनावल व पंचक्रोशीत या प्रकाराची जोरदार चर्चा होती. अद्यापपावेतो ईडीकॅश कंपनीची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळाली नाही.