तासाभरातच महामार्गावरून जात आहेत ४० डंपर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:16 IST2021-04-09T04:16:01+5:302021-04-09T04:16:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हाभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाची सर्व यंत्रणा कोरोना रोखण्यासाठी लावण्यात ...

तासाभरातच महामार्गावरून जात आहेत ४० डंपर
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हाभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाची सर्व यंत्रणा कोरोना रोखण्यासाठी लावण्यात आली आहे. मात्र, याचा फायदा वाळू माफियांकडून घेतला जात असून, गिरणा नदीपात्रात महसूल प्रशासनाचा नाकावर टिच्चून भरदिवसा अनधिकृतपणे वाळू उपसा सुरू आहे. विशेष म्हणजे रीतसर ठेका दिलेल्या पात्रातून कमी, तर अनधिकृतपणे आव्हानी, निमखेडी, खेडी, बांभोरी या भागातून मोठ्या प्रमाणात उपसा सुरू असून, राष्ट्रीय महामार्गावरून दिवसाढवळ्या वाळूचे भरलेले डंपर ये-जा करत असताना देखील कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
सध्या गिरणा नदीपात्रात टाकरखेडा, वैजनाथ व सावखेडा परिसराचा ठेका रीतसर करण्यात आला आहे. मात्र, या भागाव्यतिरिक्त इतर भागांतून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. यामुळे महसूल प्रशासनाचा लाखोंचा महसूल बुडत असून, पर्यावरणाची देखील मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. याबाबत महसूल विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळेस देखील नदीपात्रात वाळू उपसा सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मध्यंतरी महसूल व पोलीस प्रशासनाकडून रात्रीच्या वेळेस काही प्रमाणात पेट्रोलिंग केले जात होते; मात्र आता ते नियमितपणे होत नसल्याने महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष वाळू माफियांच्या पथ्यावर पडताना दिसून येत आहे.
तासाभरातच महामार्गावरून जात आहेत ४० डंपर
लोकमत प्रतिनिधीने राष्ट्रीय महामार्गावर थांबून वाळूच्या डंपरची पाहणी केली. शिव कॉलनी स्टॉपजवळ तासाभरातच गिरणा नदीपात्राकडून येणारी तब्बल ४० हून अधिक वाळूने भरलेले डंपर ये-जा करत असल्याचे आढळून आले. यामध्ये २० हून अधिक ट्रॅक्टरचा देखील समावेश होता. यापैकी निम्मे डंपर हे अनधिकृतपणे वापर करत असल्याचे आढळून आले. कारण आव्हाने भागात कोणताही ठेका नसताना या भागातून अनेक डंपर ये-जा करीत असल्याचे देखील आढळून आले.
नदीपात्रातूनच नव्हे, तर नदीच्या पाण्यातून देखील केला जातोय उपसा
आव्हाने, निमखेडी, फुपनगरी या भागातून महसूल प्रशासनाने कोणताही ठेका दिलेला नाही. मात्र, या भागातून सर्वांत जास्त उपसा होत आहे. या भागात नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी असून, पाण्यात जेसीबीच्या साह्याने वाळू उपसा केला जात आहे. विशेष म्हणजे आव्हाने येथे महसूलचे पथक दिवसभर ठाण मांडून असते. असे असताना देखील या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. विशेष म्हणजे तलाठी कार्यालयासमोरूनच सर्व वाहने ये-जा करत असताना देखील कोणतीही कारवाई होत नसल्याने पुन्हा या भागाकडे महसूल प्रशासनाने मुद्दामहून डोळेझाक केल्याचे पाहावयास मिळत आहे.
आव्हानीचा ठेका रद्द, ग्रामस्थांना कंटाळून ठेका केला सरेंडर
धरणगाव तालुक्यातील आव्हानी या गावातील गिरणा नदीपात्राचा ठेका देण्यात आला होता. मात्र, गावातील ग्रामपंचायतीच्या समितीला कंटाळून संबंधित ठेकेदाराने हा ठेका महसूल प्रशासनाकडे पुन्हा सरेंडर केला आहे. परिसरातील गावांमधून वाळूचे डंपर ये-जा करण्यास विरोध होत असल्याने हा ठेका ठेकेदाराने सरेंडर केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. हा ठेका बंद झाला असला तरी या भागातून अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. यावर त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.