दुचाकीची डिकी फोडून मेडिकल चालकाचे ३७ हजार लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:21 IST2021-09-24T04:21:24+5:302021-09-24T04:21:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : विसनजी नगरातील दुकानात साहित्य खरेदी करीत असताना बाहेर पार्किंग केलेल्या दुचाकीची डिकी उघडून ...

दुचाकीची डिकी फोडून मेडिकल चालकाचे ३७ हजार लांबविले
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : विसनजी नगरातील दुकानात साहित्य खरेदी करीत असताना बाहेर पार्किंग केलेल्या दुचाकीची डिकी उघडून किशोर पन्नालाल भंडारी (वय ६७) यांची ३७ हजार ५०० रुपये असलेली बॅग लांबविल्याची घटना गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी रात्री अकरा वाजता जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किशोर पन्नालाल भंडारी यांचे शहरात भंडारी मेडिकल आहे. रात्री आठ वाजता दुकानातून निघताना भंडारी यांनी ३७ हजार ५०० रुपये एका बॅगेत टाकून ती दुचाकीच्या (एम.एच.१९ ए.आर.४४०१) डिकीत ठेवली. त्यातून घरी जात असताना रस्त्यात लक्ष्मी स्वीट मार्टच्या परिसरातील एका दुकानाच्या बाहेर दुचाकी लावून ते दुकानात खरेदीसाठी गेले, तेथून साडेनऊ वाजता घरी आले. डिकीतून बॅग काढायला गेले असता तेथे बॅग नव्हती. त्यामुळे भंडारी तेथून पुन्हा ज्या मार्गाने आले त्या मार्गाने रस्त्यावर बॅग शोधत गेले; मात्र कुठेच मिळाली नाही. दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एकजण संशयास्पदरीत्या दुचाकीजवळ आढळून आला. यानंतर भंडारी यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी शहरात संशयितांचा शोध सुरू केला.