एकाच शेतकऱ्याच्या ३५ शेळ्या चोरीला गेल्या अन्...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:22 IST2021-08-18T04:22:45+5:302021-08-18T04:22:45+5:30

दहशत पोलिसांची चोरांवर असली पाहिजे. मात्र मेहुणबारे पोलीस स्टेशन हद्दीत चोरांची जनतेवर दहशत निर्माण झाली आहे. पोटच्या पोराप्रमाणे शेतकरी ...

35 goats of the same farmer were stolen and ... | एकाच शेतकऱ्याच्या ३५ शेळ्या चोरीला गेल्या अन्...

एकाच शेतकऱ्याच्या ३५ शेळ्या चोरीला गेल्या अन्...

दहशत पोलिसांची चोरांवर असली पाहिजे. मात्र मेहुणबारे पोलीस स्टेशन हद्दीत चोरांची जनतेवर दहशत निर्माण झाली आहे. पोटच्या पोराप्रमाणे शेतकरी आपल्या जनावरांना वाढवतात. एकीकडे नोकऱ्या नाहीत, म्हणून अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण पशुपालनाकडे वळत आहेत. मात्र दुसरीकडे त्यांची लाखोंच्या किमतीची जनावरे चोरीला जात असल्याने त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे.

येत्या १५ दिवसांत जनावरे चोरणाऱ्या टोळीचा तपास न लावल्यास राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे तक्रार करणार असल्याचा इशारा चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला.

धुळे-चाळीसगाव राष्ट्रीय महामार्ग २११ चिंचगव्हाण फाटा येथे पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांची जनावरे चोरीस जाणाऱ्या घटनांच्या निषेधार्थ आमदार मंगेश चव्हाण व चिंचगव्हाण परिसरातील ग्रामस्थांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनाप्रसंगी ते बोलत होते.

या वेळी भाजप तालुकाध्यक्ष प्रा. सुनील निकम, पंचायत समिती सदस्य पीयूष साळुंखे, चिंचगव्हाणचे सरपंच सुभाष राठोड, विनोद भोला पाटील, कैलास हिंमत पाटील, खडकीसिम येथील भोला पाटील, लोंढे येथील सुनील चौधरी, मेहुणबारे येथील राजू शेख, गौतम चव्हाण, दहीवद येथील कल्याण खलाणे, आबा करंकाळ, अक्षय निकम, सोनू पाटील, शरद पाटील, मच्छिंद्र पाटील, सुनील पाटील, गजमल वाघ, सुरेश वाघ, जिभाऊ पाटील आदी उपस्थित होते.

गेल्या ४ महिन्यांत चिंचगव्हाण व दहिवद परिसरातील गोविंदा मोतीराम पाटील - ३५ शेळ्या, अण्णा वामन सोनवणे - २ गायी, कैलास भास्कर निकम - १ गाय, भास्कर सोनवणे - २ शेळ्या, मोईनुद्दीन शेख - २ शेळ्या चोरीला गेल्या आहेत. मात्र मेहुणबारे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करूनदेखील आजपर्यंत त्यांचा तपास लागला नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी तत्काळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांच्याशी फोनवरून चर्चा करीत शेतकऱ्यांच्या भावना मांडल्या. मेहुणबारे पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी लवकरात लवकर तपास पूर्ण करून जनावरे चोरी करणाऱ्या टोळीचा तपास करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकऱ्यांचे मत जाणून घेतल्यानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित केले.

Web Title: 35 goats of the same farmer were stolen and ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.