लोकसभा निवडणुकीसाठी लागणार ३० हजार कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 22:41 IST2018-11-28T22:40:05+5:302018-11-28T22:41:45+5:30
आढावा बैठक

लोकसभा निवडणुकीसाठी लागणार ३० हजार कर्मचारी
जळगाव- लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारीला वेग आला आहे. या निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी जिल्ह्यात ३० हजार अधिकारी व कर्मचाºयांचे मनुष्यबळ लागणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील विविध विभागांच्या प्रमुखांकडून त्यांच्याकडे असलेल्या मनुष्यबळाची माहितीमागविण्यात आली आहे. त्यापैकी ५० टक्केच माहिती मिळाली असल्याने बुधवार, २८ रोजी याबाबत आढावा बैठक होऊन उर्वरित माहिती ७ दिवसांत मागविण्यात आली.
लोकसभा निवडणुकांसाठी एप्रिल महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या कामाला गती देण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया तसेच मतमोजणी व विविध पथकांसाठी एकूण ३० हजार मनुष्यबळ लागणार आहे. त्यासाठी निवडणुक उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे यांनी जिल्ह्यातील सर्व केंद्र व राज्य शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, राष्टÑीयकृत बँकांच्या विभाग प्रमुखांकडून त्यांच्याकडील उपलब्ध मनुष्यबळाची माहिती मागविली होती. ही माहिती तालुकास्तरावर संकलीत होऊन जिल्ह्याला एनआयसीत एकत्रित केली जात आहे. या माहिती संकलनासाठी उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांची नोडल आॅफीसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
७ दिवसांत मागविली माहिती
आतापर्यंत ५० टक्केच माहिती प्राप्त झाली असल्याने बुधवार, २८ रोजी याबाबत बैठक झाली. त्यास निवडणुक उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, एनआयसीचे प्रमोद बोराले, पत्की, नोडल आॅफीसर उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे , तहसीलदार अमोल निकम तसेच माहिती सादर न केलेल्या विभागांचे प्रमुख उपस्थित होते. त्यात उर्वरीत माहिती ७ दिवसांत मागविण्यात आली आहे.