जळगाव : बाप्पाच्या आगमनानंतर आता अनंत चतुर्दशीला होणाऱ्या विसर्जनासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. नुकतीच विसर्जन स्थळांची मनपा अधिकाऱ्यांनी पाहणी केली असून, गणरायाच्या मूर्ती संकलनासाठी शहरातील चार प्रभागांमध्ये २८ संकलन केंद्र तयार करण्यात आली आहेत. एवढेच नव्हे तर अर्पण रथाचीही व्यवस्था मनपाकडून करण्यात आली आहे.
शुक्रवार, दि. १० रोजी श्री गणेश चतुर्थीला सार्वजनिक मंडळांमध्ये व घराघरांमध्ये भक्तिमय वातावरणात ‘श्रीं’चे आगमन झाले. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पध्दतीने गणेश मंडळांकडून गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, आरास न साकारता यावर्षी गणेश मंडळांनी सामाजिक उपक्रमांवर भर दिला होता. गणेश मंडळे कोरोना व लसीकरणाविषयी जनजागृती करताना बघायला मिळाली. आता मनपा प्रशासन बाप्पाच्या विसर्जनासाठी सज्ज झाले आहे. तसे नियोजनही मनपाकडून करण्यात आले असून, नुकतीच अधिकाऱ्यांकडून मेहरूण तलावावरील गणेश घाटाची व सेंट टेरेसा स्कूल परिसरातील विसर्जन स्थळाची पाहणी करण्यात आली.
५० पट्टीचे पोहणारे तैनात
रविवारी विसर्जनाच्या दिवशी मेहरूण तलाव येथे ५० पट्टीचे पोहणारे तैनात असणार आहेत. तसेच मनपाकडून सात तराफे बनविण्याचे कामसुध्दा पूर्ण झालेले आहे. तर लाईफ बोटदेखील तलावावर असेल. सोबत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही विसर्जनस्थळी असणार आहे. त्याशिवाय निर्माल्य संकलनासाठी सहा वाहने नागरिकांच्या सुविधेसाठी असतील, अशी माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दोन ठिकाणी करता येणार विसर्जन
शहरातील मेहरूण तलावावरील गणेश घाट व सेंट टेरेसा स्कूलजवळ तयार केलेल्या विसर्जन स्थळावरच बाप्पांचे विसर्जन करता येईल. गिरणा पंपिंग परिसर, निमखेडी परिसरातील गिरणा नदीपात्रात व इतर ठिकाणी विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच मेहरूण तलावाकडे येणाऱ्या सात रस्त्यांवर बॅरिकेट्स लावली जाणार आहेत. विशेष म्हणजे, निर्माल्य संकलन झाल्यानंतर शिवाजी उद्यानात त्या निर्माल्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.