२७ दिवस पॉझिटिव्हिटी एक टक्क्याच्या खाली स्थिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:16 IST2021-07-29T04:16:56+5:302021-07-29T04:16:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हाभरात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख हा गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून घसरला आहे. गेल्या दोन ...

२७ दिवस पॉझिटिव्हिटी एक टक्क्याच्या खाली स्थिर
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हाभरात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख हा गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून घसरला आहे. गेल्या दोन महिन्यांच्या बाधितांच्या प्रमाणांचा विचार केला असता. गेल्या दोन महिन्यांपासून हे प्रमाण एक टक्का आणि नंतर त्यापेक्षा कमी नोंदविण्यात येत आहे. गेल्या २७ दिवसांपासून कोरोनाची पॉझिटिव्हिटी ही एक टक्क्याच्या खाली स्थिर आहे.
जिल्ह्याची पॉझिटिव्हिटी ही जुलैत ०.२५ टक्के नोंदविली गेली आहे. हे प्रमाण त्या मानाने कमी असल्याचे तज्ज्ञ सांगतात. गेल्या दोन महिन्यांपासून कोणत्याच भागात मोठी वाढ आढळून आलेली नाही. पहिल्या लाटेपेक्षाही दुसऱ्या लाटेनंतरची स्थिती सुधारली आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेतील अंतरामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या कधीच शंभराच्या खाली गेली नव्हती, मात्र, दुसऱ्या लाटेत सक्रिय रुग्णांची संख्यादेखील ८४वर पोहोचली आहे. त्यामुळे दोन महिन्यांपासून परिस्थिती आटोक्यात असल्याचे समाधानकारक चित्र जिल्हाभरात आहे.
२७ दिवसांत २६३
जुलै महिन्यात एकत्रित २७ दिवसात २६३ रुग्ण समोर आले आहेत. गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत हे प्रमाण दहा टक्क्यांवर आले आहे. जून महिन्यात २३०० रुग्ण आढळून आले होते. दरम्यान, गेल्या महिनाभरात सरासरी रोज नऊ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे हे प्रमाण दहापेक्षा कमी असल्याने कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचे दिसते. विशेष बाब म्हणजे जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये एकही सक्रिय रुग्ण नाही. यात बोदवड, पारोळा आणि एरंडोल या तालुक्यांचा समावेश आहे.
पाच मृत्यू
महिनाभरात कोरोनाबाधितांचे पाच मृत्यू झाले आहेत. जून महिन्यांच्या तुलनेत हे प्रमाण कमी झाले आहे. जून महिन्यात ४८ मृत्यू झाले होते. मृत्यूचे प्रमाणही घटत असल्याचे यावरून समोर येत आहे.
पॉझिटिव्हिटी अशी
मे : आरटीपीसीआर चाचण्या : ७४,७६९, बाधित ५२७३, पॉझिटिव्हिटी : ७.०५ टक्के
जून : आरटीपीसीआर चाचण्या : ७६,८२३, बाधित : ८५४, पॉझिटिव्हिटी : १.११ टक्के
जुलै : आरटीपीसीआर चाचण्या : ४६,३०० बाधित : १२० पॉझिटिव्हिटी : ०.२५ टक्के
पहिला पॅटर्न काय सांगतो
कोरोनाची पहिली लाट ही साधारण ऑक्टोबर महिन्यापासून ओसरू लागली होती. डिसेंबरअखेर व जानेवारी महिन्यात ती अगदी कमी होती. मात्र, १५ फेब्रुवारीपासून रुग्ण वाढायला सुरुवात झाली होती. पहिली लाट ओसरल्याने व दुसरी लाट सुरू होणे यात ३ ते ४ महिन्यांचा अवधी होता. दुसऱ्या लाटेत एप्रिलअखेरपासून रुग्ण कमी होण्यास सुरुवात झाली होती. त्यात जुलै महिन्यात रुग्णसंख्या कमी झालेली आहे. हा पॅटर्न बघता ऑगस्टअखेर किंवा सप्टेंबर महिन्यात कशी परिस्थिती राहते यावर तिसरी लाट अवलंबून असू शकते, असे तज्ज्ञ सांगतात. मात्र, ठोस अद्याप कोणाकडेच याचे उत्तर नसल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.