२६ लाख थकविल्याने कॉम्प्टनविरोधात तक्रार
By Admin | Updated: May 9, 2014 09:38 IST2014-05-08T21:08:13+5:302014-05-09T09:38:09+5:30
वीज चोरी करणार्या ग्राहकांकडून तडजोड शुल्काच्या स्वरूपात वसूल केलेली २६ लाख ५१ हजार रुपयांची रक्कम शासनाच्या खात्यात न भरल्याने क्रॉम्प्टनच्या विरोधात वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता सुभाषचंद्र सदावर्ते यांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे.

२६ लाख थकविल्याने कॉम्प्टनविरोधात तक्रार
जळगाव : वीज चोरी करणार्या ग्राहकांकडून तडजोड शुल्काच्या स्वरूपात वसूल केलेली २६ लाख ५१ हजार रुपयांची रक्कम शासनाच्या खात्यात न भरल्याने क्रॉम्प्टनच्या विरोधात वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता सुभाषचंद्र सदावर्ते यांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. पोलिसांनी क्रॉम्प्टनला याप्रकरणी आपले म्हणणे सादर करावे यासाठी पत्र दिले आहे.
जळगाव शहर व तालुक्यासाठी वीज वितरण कंपनी आणि क्रॉम्प्टन यांच्यात १ नोव्हेंबर २०११ पासून करार झाला आहे. जळगाव शहर आणि तालुक्यातील वीज वितरण, देखभाल दुरुस्ती आणि विज बिल वसुलीचा ठेका क्रॉम्प्टनला देण्यात आला आहे. या दरम्यान विद्युत कायदा कलम २००३ प्रमाणे वीज चोरी करणार्या काही ग्राहकांवर वीज कंपनी व क्रॉम्प्टन यांच्यातर्फे कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर ४२ जणांकडून तडजोड शुल्क म्हणून क्रॉम्प्टनने २६ लाख ५१ हजार रुपये वसूल केले आहेत. ही रक्कम त्यांनी शासनाच्या खात्यात जमा करणे अपेक्षित होते. मार्च २०१४ पर्यंत त्यांनी ती रक्कम जमा न केल्याने कार्यकारी अभियंता सुभाषचंद्र सदावर्ते यांनी लेखी पत्र देऊन विचारणा केली होती. त्यानंतरही क्रॉम्प्टनकडून काही प्रतिसाद न मिळाल्याने सदावर्ते यांनी शासकीय रकमेचा अपहार केल्याचे नमूद करीत क्रॉम्प्टनच्या नावाने जिल्हापेठ पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिला आहे.
हा अर्ज प्राप्त झाल्यानंतर पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांनी क्रॉम्प्टनच्या अधिकार्यांना या प्रकरणात शुक्रवारी संध्याकाळपर्यंत आपले म्हणणे सादर करावे या आशयाचे पत्र दिले. त्यानुसार गुरुवारी दुपारी क्रॉम्प्टनचे व्यवस्थापक (लिगल) नईम रज्जाक यांना जिल्हापेठ पोलीस स्टेशनला जाऊन कंपनीची बाजू मांडली. शुक्रवारी संध्याकाळी कंपनीतर्फे आपले म्हणणे सादर केले जाईल असे त्यांनी जिल्हापेठ पोलिसांना सांगितले.