शस्त्राचा धाक दाखवून २३ लाखांचा ऐवज लुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:55 IST2021-02-05T05:55:58+5:302021-02-05T05:55:58+5:30
मोहाडी रस्त्यावरील दौलत नगरात पिंटू बंडू इटकर यांचा अलिशान बंगला आहे. त्यात ते पत्नी मनीषा व मुलगी हरिप्रिया (वय ...

शस्त्राचा धाक दाखवून २३ लाखांचा ऐवज लुटला
मोहाडी रस्त्यावरील दौलत नगरात पिंटू बंडू इटकर यांचा अलिशान बंगला आहे. त्यात ते पत्नी मनीषा व मुलगी हरिप्रिया (वय ३) यांच्यासह वास्तव्याला आहेत. इटकर हे स्टीलचे होलसेल व्यापारी आहेत. मंगळवारी रात्री घरात ते, पत्नी व मुलगी असे तिघंच होते. मुख्य प्रवेशद्वारावरून उडी घेऊन दरोडेखोर बंगल्यात शिरले. वरच्या मजल्यावर आल्यावर त्यांनी झोपलेल्या दांपत्याला उठविले व एकाने गळ्याला शस्त्र लावून जीव प्यारा आहे ना? असे धमकावत घरातील रोकड व दागिने काढायला लावले. सर्व जणांनी अंगात स्वेटर व तोंडाला रुमाल बांधलेला होता. तर एकाने काळ्या रंगाचे जोकर मास्क लावलेले होते. सर्व जण मराठी अर्थात खास करून जळगाव जिल्ह्यात बोलली जाणारी भाषा बोलत होते. कपाटाच्या ड्राॅवरमध्ये ठेवलेले तीन लाख रुपये रोख व कपाटात ठेवलेले २० लाखांचे सोन्याचे दागिने काढून पिशवीत टाकले. जातांना दोघांजवळील मोबाइल हिसकावून घेत घरातून पळ काढला. जाताना मोबाइल खाली लोखंडी गेटजवळ ठेवले होते.
दरोडेखोर २५ ते ३५ वयोगटातील
पिंटू इटकर यांच्या बंगल्यात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. त्यातील एका कॅमेऱ्याचा डीव्हीआर दरोडेखोरांनी काढून नेलेला आहे. तर दुसऱ्या एका कॅमेऱ्यात तीन जण कैद झालेले आहेत. लोखंडी गेटवरून उडी घेऊन आतमध्ये येतांना व वरच्या मजल्यावर जातांना स्पष्टपणे दिसून येत आहे. सर्वांचे वय साधारण २५ ते ३५ वयोगटातीलच आहे. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी घटनास्थळी धाव घेऊन इटकर दांपत्याला धीर दिला.