जिल्ह्यात आठ महिन्यात २२८ महिला, मुली ठरल्या विकृतांच्या वासनेच्या शिकार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:20 IST2021-09-17T04:20:42+5:302021-09-17T04:20:42+5:30

न्यायालयाने दीड वर्षात १८ विकृतांना ठोठावली शिक्षा स्टार : ११८१ सुनील पाटील जळगाव : देश, राज्य पातळीवर निर्भयासारख्या घटना ...

228 women and girls became victims of lust in eight months in the district! | जिल्ह्यात आठ महिन्यात २२८ महिला, मुली ठरल्या विकृतांच्या वासनेच्या शिकार !

जिल्ह्यात आठ महिन्यात २२८ महिला, मुली ठरल्या विकृतांच्या वासनेच्या शिकार !

न्यायालयाने दीड वर्षात १८ विकृतांना ठोठावली शिक्षा

स्टार : ११८१ सुनील पाटील

जळगाव : देश, राज्य पातळीवर निर्भयासारख्या घटना सातत्याने घडत आहेत, कायद्याने अशा विकृतांना शिक्षाही ठोठावली जात असली तरी कायद्याची भीती किंवा धाक न बाळगणारे विकृत आजही समाजात वावरत असून त्यामुळे महिला व मुलींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. एकट्या जळगाव जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यात २२८ महिला व अल्पवयीन मुली विकृतांच्या वासनेच्या शिकार ठरल्या आहेत. ७३ महिलांवर बलात्कार तर १५५ मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे.

प्रत्येक गुन्हेगाराला जरब, वचक बसावी, कायद्याचा धाक वाटावा व भविष्यात असा गुन्हा कोणी करु नये यासाठी न्याय यंत्रणा सक्षमपणे आपले कार्य करीत आहे. गेल्या वर्षी बलात्काराच्या गुन्ह्यातील १० तर विनयभंगाच्या गुन्ह्यात दोन अशा १२ जणांना तर चालू वर्षात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ६ जणांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. असे असले तरी बलात्कार, विनयभंग, अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन या घटना कमी झालेल्या नाहीत. गेल्या वर्षी बलात्काराच्या ८१ घटना जिल्ह्यात घडल्या होत्या तर यंदा आठ महिन्यातच ७३ घटना घडलेल्या आहेत. २०१९ मध्ये तर बलात्काराचे शतकच झाले होते. १०० गुन्हे दाखल झाले होते. काही घटना अशा घडलेल्या आहेत की त्यात अत्याचार करणाऱ्यांची नावे पुढे आलेली नाहीत. मूकबधिर व अंध मुलींवर विकृतांनी मातृत्व लादलेले आहे. पिंपळगाव हरेश्वर व रामानंद नगर पोलीस ठाण्यात अशा गुन्ह्यांची नोंद आहे.

गतवर्षीच्या तुलनेत अद्याप तरी घट

गतवर्षी बलात्काराचे ८१ गुन्हे जिल्ह्यात दाखल झाले होते, त्यापैकी सर्वच आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. यंदा ऑगस्टपर्यंत आठ महिन्यात बलात्काराचे ७३ गुन्हे दाखल झालेले आहेत. २०१९ मध्ये हा आकडा शंभराचा होता, ९९ टक्के गुन्हे उघड झाले होते. यंदा देखील गुन्हे उघड करण्याचे प्रमाण ९९ टक्के आहे. बलात्काराचा आकडा वाढलेला दिसत असला तरी काही प्रकरणांमध्ये संमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित झालेले आहेत, आपसात वाद झाल्याने त्यातून बलात्काराचे हत्यार उपसण्यात आल्याचे देखील तितकेच सत्य आहे. लग्नाचे आमिष व इतर कारणांचा त्यात समावेश आहे.

१५५ अल्पवयीन मुलींना पळविले

जिल्ह्यात आठ महिन्यात १५५ अल्पवयीन मुलींना पळविण्यात आलेले आहे. नवीन कायद्यानुसार १८ वर्षांच्या आतील मुलगी किंवा मुलगा घरातून गेला असेल तर त्यात अपहरणाचा गुन्हा दाखल होतो, त्यामुळे प्रत्येक प्रकरणात लैंगिक अत्याचार झालाच असेल असे नाही. २०२० मध्ये १७७ अल्पवयीन मुलींना पळविण्यात आले होते. शनी पेठ पोलीस ठाण्यात दाखल एका प्रकरणात अल्पवयीन मुलीला पळविले म्हणून अपहरण व त्यानंतर बलात्काराचाही गुन्हा दाखल झालेला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात देखील अशाच पद्धतीचा एक गुन्हा दाखल झालेला आहे.

Web Title: 228 women and girls became victims of lust in eight months in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.