तहान भागविण्यासाठी एस.टी.च्या चालकाने दिले 2 महिन्याचे वेतन
By Admin | Updated: April 6, 2017 18:09 IST2017-04-06T18:09:29+5:302017-04-06T18:09:29+5:30
जळगाव बस आगारात थंड पाण्याचे कूलर नादुरुस्त झाल्याने बस चालक शिवाजी हटकर यांनी नवीन कुलर खरेदी करण्यासाठी दोन महिन्यांचे 30 हजार रुपये वेतन दिले आहे.
तहान भागविण्यासाठी एस.टी.च्या चालकाने दिले 2 महिन्याचे वेतन
जळगाव,दि.6- जळगाव बस आगारात थंड पाण्याचे कूलर नादुरुस्त झाल्याने बस चालक शिवाजी हटकर यांनी नवीन कुलर खरेदी करण्यासाठी दोन महिन्यांचे 30 हजार रुपये वेतन दिले आहे. त्यांच्या या कार्याचा 6 एप्रिल रोजी बस आगारात सत्कार करण्यात आला.
आगारातील कूलर नादुरुस्त झाल्याने एसटी कामगारांना बसस्थानकावरील जलमंदिर येथे धाव घ्यावी लागते, तेथेदेखील व्हॉल्व्ह खराब असल्याने पुरेशा पाण्याअभावी प्रचंड हाल होत होतात. या संदर्भात सेना अॅक्शन टीमचे गोपाळ पाटील यांनी बसस्थानकावरील समस्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडल्या असता जळगाव आगारातील एसटी चालक व कामगार सेनेचे सल्लागार शिवाजी हटकर यांनी त्याची दखल घेतली व कामगार कल्याण समिती कडून वॉटर कूलर घेण्याचा सल्ला दिला. मात्र आर्थिक अडचणीमुळे ते शक्य झाले नाही.
हटकर यांनीच पुढाकार घेत जळगाव आगारात कर्मचा:यांना सुखद धक्का देत त्यांनी कोणाचीही मदत न घेता वॉटर कूलर घेण्याचे ठरविले व दोन महिन्यांचा पगार (30 हजार रुपये) जमा करून 6 एप्रिल रोजी वॉटर कूलर खरेदी करून जळगाव आगारास भेट दिले.
यावेळी एसटी कामगार सेनेचे कार्याध्यक्ष आर. के. पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चिंतामण जैतकर,आगार व्यवस्थापक एस. बी. खडसे कामगार अधिकारी एन. डी. मोरे, इंटकचे विभागीय सचिव नरेंद्रसिंग राजपूत, मान्यताप्राप्त संघटनेचे विभागीय अध्यक्ष सुरेश चांगरे आदी उपस्थित होते.
त्यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे हटकर यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कारामुळे हटकर व त्यांच्या मुलाच्या डोळ्यात अश्रू तरळले. जि. प. सदस्य प्रताप पाटील यांनी चालकाचे कौतुक करून दत्त मंदिरास 11 हजाराची देणगी दिली.