१७ हजार विद्यार्थ्यांनी दिली ५ वी, ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:21 IST2021-08-13T04:21:36+5:302021-08-13T04:21:36+5:30
१३ सीटीआर १६ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेला जळगाव ...

१७ हजार विद्यार्थ्यांनी दिली ५ वी, ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा
१३ सीटीआर १६
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेला जळगाव जिल्ह्यातून पाचवी व आठवी मिळून १७ हजार ३०० विद्यार्थी सामोरे गेले, तर २ हजार ९०० विद्यार्थ्यांनी दांडी मारली. जिल्हाभरात गुरुवारी १७० केंद्रांवर ही परीक्षा सुरळीत पार पडली. सकाळपासून पालकांची केंद्राबाहेर गर्दी होती. दोन सत्रात झालेली परीक्षा ही केंद्रांवर कोरोनाचे नियम पाळून सुरळीत पार पडली.
जळगाव जिल्ह्यातून पाचवीसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्ह्यातून १२ हजार ८३६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील १० हजार ६९१ विद्यार्थ्यांनी पहिला पेपर दिला. तर तब्बल २ हजार १४६ जण गैरहजर होते. तर आठवी साठीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या परीक्षेसाठी ७ हजार ३५७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील ६ हजार ६०९ विद्यार्थ्यांनी पहिला पेपर दिला तर ७४८ विद्यार्थ्यांनी दांडी मारली. परीक्षेचा पहिला पेपर हा सकाळी ११ ते १२.३० यावेळेत घेण्यात आला. पहिल्या सत्रात प्रथम भाषा आणि गणिताचा पेपर झाला.
'पेपर-१'ला २१७४ विद्यार्थ्यांची दांडी
दुसरा पेपर हा दुपारी १.३० ते ३.३० यावेळेत घेण्यात आला. दुपार सत्रात तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी विषयाचा पेपर पार पडला. पाचवी शिष्यवृत्तीच्या दुस-सा पेपरला १० हजार ६६३ विद्यार्थी सामोर गेले तर २ हजार १७४ विद्यार्थ्यांनी दांडी मारली. तसेच आठवीच्या शिष्यवृत्तीच्या पेपर दोनला ६ हजार ५९९ विद्यार्थी सामोरे गेले तर ७५८ विद्यार्थ्यांनी दांडी मारली.
३०० गुणांची परीक्षा
पाचवी-आठवी शिष्यवृत्ती परीक्षा ही एकूण ३०० गुणांची होती. पहिल्या सत्रातील प्रत्येक ७५ प्रमाणे दोन आणि दुसऱ्या सत्रातील दोन्ही पेपर्ससाठी प्रत्येकी ७५ गुणांचे होते. मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू आणि गुजराथी या चार भाषांमध्ये ही परीक्षा झाली. परीक्षेसाठी केंद्रांबाहेर पालक व विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. तापमान मोजून व सॅनिटाईज करून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांत प्रवेश दिला जात होता. दुपारी पेपर सुटल्यानंतर केंद्राबाहेर प्रचंड गर्दी झाली होती.
शहरातील ७ केंद्रांवर परीक्षा सुरळीत
पाचवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा ही शहरातील बीयूएन रायसोनी, भगीरथ इंग्लिश मीडियम स्कूल, ला.ना. विद्यालय व अॅग्लो उर्दू हायस्कूल या परीक्षा केंद्रांवर तर आठवीसाठीची शिष्यवृत्ती परीक्षा ही शहरातील प्रगती विद्यालय, मिल्लत हायस्कूल, ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय परीक्षा केंद्रावर पार पडली.