जळगाव : शेतकऱ्यांसाठी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाचा उत्सव म्हणजे पोळा. सोमवारी एकीकडे बैलाची सजावट सुरू असतानाच दुसरीकडे धरणावर बैलाला आंघोळीसाठी गेलेल्या सागर ज्ञानेश्वर माळी (वय १५) या बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना खर्ची, ता. एरंडोल येथे सकाळी आठ वाजता घडली. या घटनेमुळे क्षणातच बैलाच्या सणावर विरजण पडले.
खर्ची गावापासून दोन किलोमीटर अंतरावर धरण असून शेतकरी याच धरणात बैल धुण्यासाठी जात असतात. सोमवारी पोळा असल्याने सर्व ग्रामस्थ बैल धुण्यासाठी धरणावर गेले होते. ग्रामस्थांसोबत सागर माळी हासुद्धा बैल धुण्यासाठी गेला. बैलाला आंघोळ घातल्यांनतर चिखलात पाय फसल्याने तो बुडाला. प्रकार लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी त्याला बाहेर काढून तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच खोटेनगरजवळ वाटेतच सागरचा मृत्यू झाला. सागरच्या पश्चात वडील ज्ञानेश्वर दोधू माळी, आई गंगाबाई, बहीण भावना, भाऊ निर्मल, असा परिवार आहे. सागर हा मोठा होता. तसेच तो आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. रुग्णालयात सागरच्या वडिलांनी मन हेलावणारा आक्रोश केला. दरम्यान घटनेने खर्ची गावात हळहळ व्यक्त होत आहे.