आव्हाण्यात एकाच रात्रीत १२ घरफोड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:12 IST2021-07-03T04:12:31+5:302021-07-03T04:12:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : तालुक्यातील आव्हाणे येथे गुरुवारी मध्यरात्री तब्बल १२ घरफोड्या झाल्या असून, या घरफोड्यांमधून लाखोंचा ऐवज ...

आव्हाण्यात एकाच रात्रीत १२ घरफोड्या
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तालुक्यातील आव्हाणे येथे गुरुवारी मध्यरात्री तब्बल १२ घरफोड्या झाल्या असून, या घरफोड्यांमधून लाखोंचा ऐवज लंपास झाला आहे. मात्र, या प्रकरणी दोघांनी फिर्याद दिल्यावरून, तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घरफोडीमध्ये एकूण ३१ ग्रॅम सोन्याचे दागिने, ६० भार चांदी व सुमारे ४० हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. गावातील रहदारीचा भाग सोडून चोरट्यांनी नवीन प्लॉट भागात या चोऱ्या केल्या आहेत. या घरफोड्यांमध्ये जी घरे अनेक दिवसांपासून बंद होती किंवा घरातील सदस्य बाहेर गावाला गेले होते. अशीच घरे यामध्ये चोरट्यांनी टार्गेट केले आहे.
रेकी करून केली घरफोडी
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात या घरफोड्या रेकी करून करण्यात आल्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे. चोरट्यांनी सरुआई नगरातील एक घर फोडले, हे घर फोडण्याआधी चोरट्यांनी या गल्लीमधील इतर घरांच्या बाहेरून कड्या लावून घेतल्या होत्या. याबाबत दोघांनी तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यात ६७ हजार १०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. अन्य १० जणांनी फिर्याद देणे मात्र टाळले आहे.