११ वी सायन्सच्या तुकड्या झाल्या फुल्ल; बहुसंख्य विद्यार्थी प्रवेशापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:17 IST2021-09-19T04:17:26+5:302021-09-19T04:17:26+5:30
रावेर : शासनाने मंजूर तुकड्यांमध्ये विद्यार्थी संख्येच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश देऊ नये या अध्यादेशानुसार शहरातील सरदार जी. जी. हायस्कूल ...

११ वी सायन्सच्या तुकड्या झाल्या फुल्ल; बहुसंख्य विद्यार्थी प्रवेशापासून वंचित
रावेर : शासनाने मंजूर तुकड्यांमध्ये विद्यार्थी संख्येच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश देऊ नये या अध्यादेशानुसार शहरातील सरदार जी. जी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील ११ वी सायन्सच्या चारही तुकड्या फुल्ल झाल्या आहेत. अजूनही शहर व परिसरातील शेकडो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत आहेत. हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून शासनाने शालेय प्रशासनाला संबंधित वंचित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासंदर्भात तातडीने आदेश पारीत करावेत अशी मागणी होत आहे.
शहरातील सरदार जी. जी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ही जुनी व गुणात्मक दर्जाची शालेय शिक्षण संस्था असल्याने शहरातील व परिसरातील विद्यार्थ्यांचा विज्ञान शाखेत प्रवेश मिळवण्यासाठी येथे मोठा लोंढा वळत असतो. यंदाही या कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता ११ वी सायन्सच्या प्रवेशासाठी पालक व विद्यार्थी वर्गाची कमालीची झुंबड उडाली असून या कनिष्ठ महाविद्यालयातील चार तुकड्यांमधील ३२० विद्यार्थी क्षमतेच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे; मात्र गुणवत्ता प्राप्त अजून शेकडो विद्यार्थी अद्याप वंचित असून शालेय प्रशासनाने क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये या शासन अध्यादेशानुसार प्रवेश नाकारला आहे.
शासन अध्यादेशानुसार शहर व परिसरातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत असल्याने हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून शासनाने शालेय प्रशासनाला वंचित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबत तातडीने आदेश पारीत करावा अशी मागणी वंचित विद्यार्थी व पालक वर्गातून होत आहे. जि. प. अध्यक्षा रंजना पाटील यांनी तातडीने लक्ष घालून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताची बाब धसास लावावी अशी मागणी होत आहे. यासंदर्भात शालेय प्रशासनाशी संपर्क साधला असता इयत्ता ११ वी सायन्सच्या तुकड्यांमधील क्षमता पूर्ण झाली आहे; मात्र पालक व सामाजिक तथा राजकीय संघटनांकडून प्रवेश मिळवण्यासाठी अनेक निवेदनांद्वारे मागणी होत असल्याची पुष्टी जोडली आहे.